Join us

Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 05:48 IST

Mumbai metro line 2b latest news: पुढील दोन-तीन महिने या चाचण्या चालणार आहेत. त्यामुळे काही महिन्यात मंडाळे ते डायमंड गार्डन (चेंबूर) या ५.३९ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : पूर्व उपनगरांतील नागरिकांसाठी पहिली मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर बुधवारपासून गाडीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. पुढील दोन-तीन महिने या चाचण्या चालणार आहेत. त्यामुळे काही महिन्यात मंडाळे ते डायमंड गार्डन (चेंबूर) या ५.३९ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी मेट्रोतून प्रवास केला. 

यापूर्वीच्या नियोजनानुसार ‘मेट्रो २ ब’चे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कामाला विलंब झाला. आता या मेट्रोची पहिल्या टप्प्यातील ९८ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. 

मंडाळे डेपोची ९८ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून कारशेड ३१.४ हेक्टर जागेवर आहे. या कारशेडमध्ये ७२ मेट्रो उभ्या करता येतील. आता प्रणालीची कामे सुरू आहेत. त्यामध्ये ई अँड एम, एस अँड टी, ट्रॅक आणि एमईपी आदी कामे सुरू आहेत. 

डायमंड गार्डन ते डी. एन. नगर या उर्वरित मार्गावरील मेट्रोची कामे अद्याप सुरू आहेत. उर्वरित मार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या स्थानकांवर?

मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन.

मेट्रो कुठे जोडली जाणार?

रस्ते : व्ही.एन. पुरव मार्ग आणि शीव-पनवेल महामार्ग

रेल्वे : मानखुर्द येथे हार्बर रेल्वे लाइनला जोडणी.

मेट्रो : मंडाले येथे मेट्रो ८ए ला भविष्यात जोडण्याची योजना. 

या चाचण्या चालणार 

- प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स

- स्वयंचलित भाडे संकलन प्रणाली  

- मेट्रोच्या ट्रॅकवरील डेटा जतन, निरीक्षण आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची प्रक्रिया

- सिग्नलिंग आणि रोलिंग स्टॉकसाठी सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन 

- गतीसाठी सिग्नलिंगच्या चाचण्या 

या मंजुऱ्या घेतल्या जाणार 

- इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर (ईआयजी) क्लिअरन्स फॉर ओएचई  

- आरडीएसओची मंजुरी

- ऑसिलेशन, ब्रेकिंग आणि वेगासंदर्भातील प्रमाणपत्रे

- बांधकाम विभागाकडून उद्वाहन मंजुरी   

टॅग्स :मेट्रोमुंबई ट्रेन अपडेटसार्वजनिक वाहतूकएमएमआरडीए