Mumbai Mayor: शिंदेसेनेकडूनही महिला उपमहापौर? अंतिम निर्णय मात्र फडणवीस, शिंदेच घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:52 IST2026-02-03T12:49:20+5:302026-02-03T12:52:06+5:30
मुंबईचे महापौरपद महिलासाठी आरक्षित झाल्याने मुंबईला महिला महापौर मिळणार, हे आधीच निश्चित झाले आहे

Mumbai Mayor: शिंदेसेनेकडूनही महिला उपमहापौर? अंतिम निर्णय मात्र फडणवीस, शिंदेच घेणार!
मुंबईचे महापौरपद महिलासाठी आरक्षित झाल्याने मुंबईला महिला महापौर मिळणार, हे आधीच निश्चित झाले आहे. सध्याच्या महापालिकेतील संख्याबळानुसार महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेसेनेचा असणार आहे. पण, आता मुंबईच्या उपमहापौरदेखील महिलाच बसेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापालिकेत भाजप-शिंदेसेनेला काठावरचे बहुमत मिळाले. २२७ पैकी ११८ जागा महायुतीला मिळाल्या असून, यात ८९ भाजप आणि २९ शिंदेसेना नगरसेवक आहेत. १९९८-९९ पासून, महापालिकेत युतीच्या सत्तेत तेव्हाच्या शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर पद हे भाजपकडे असायचे, हेच सूत्र होते. पण यंदा भाजप मोठा भाऊ झाला असून, शिंदेसेना २९ वर थांबल्याने त्यांना नमते घेत उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार आहे. महापौर पद हे 'महिला राखीव' झाले आहे. पण उपमहापौर या पदासाठी कोणतेही आरक्षण नसले तरी शिंदेसेनेकडून या पदावरही महिला उमेदवार दिला आणार आहे. याबाबत शिदेसेनेचे सरचिटणीस, माजी खा. राहुल शेवाळे म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील.
येत्या ११ फेब्रुवारीला मिळणार नवा महापौर
मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला असून, येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. मुंबईचा महापौर भाजपचाच असेल हे आता स्पष्ट झाले असून, १८ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. त्यानंतर २५ किंवा २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर होणार आहे.तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन नगरसेवक मंगळवारी नोंदणी करणार आहेत. महापौर पदाच्या निवडीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नोंदणी झाल्यानंतर त्याच दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील ७ दिवसांत म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.