मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:47 IST2025-12-30T17:45:42+5:302025-12-30T17:47:24+5:30
Sewri Cylinder Blast Fire: शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही स्फोटाची घटना घडली.

मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Sewri Cylinder Blast Fire: मुंबईसह राज्यभरात आज महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. काहीजण तिकीट मिळाल्याने खुश होते तर काहींना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. याचदरम्यान, मुंबईतील वडाळ्याजवळील शिवडीमध्ये सिलेंडरचे एकामागून एक चार स्फोट झाल्याची घटना घडली. शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही स्फोटाची घटना घडली.
ही घटना इतकी भयानक होती चाळीतील पाच ते सहा घरे जळून खाक झाली. या घटनेत जिवितहानी झाल्याची अद्याप तरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या घटनेने परिसरात खळबळ माजली.
VIDEO: मुंबईतल्या शिवडी येथे सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग#mumbaifire#shivdipic.twitter.com/2Jch8wtM2M
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) December 30, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास घटना घडली. या घटनेत सुरुवातीला एका चाळीतील घरात शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. ही आग पुढे पसरत गेली. सर्वप्रथम एका घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यानंतर आसपासच्या घरात असलेल्या पुढील ३ सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग पसरली. त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली. एकूण ४ सिलिंडरच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.