चिकन शिल्लक न राहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर रॉडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. अजय अरुण दाभाडे (वय, ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना ३ जुलै रोजी ट्रॉम्बे कोळीवाडा येथील त्यांच्या घरी घडली. घटनेच्या दिवशी आरोपीने जेवताना पत्नी स्वाती दाभाडे (वय, ३७) हिला चिकन वाढायला सांगितले. परंतु, तिने चिकन संपले असल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे संतापलेल्या आरोपीने लाकडी दांडक्याने स्वातीला मारहाण केली. या हल्ल्यात स्वातीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वातीचा जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी स्वातीचा पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्याचा छळ केल्याचा आरोप करणारी एक पूर्वीची तक्रार उघडकीस आली. हुंड्याची तक्रार मागे घेण्यासाठी अजय स्वातीवर दबाब आणत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अजयने स्वातीला तिच्या वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. परंतु, स्वातीने नकार दिल्याने अजयने तिचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी अजयच्या आईविरोधातही मुलाला पाठिंबा दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.