Join us

Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:34 IST

Malwani police rescue three kidnapped girls: मुंबईतील मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

Mumbai: मुंबईतील मालवणी पोलिसांच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला. पळून जाण्यास नकार दिल्याने एका मजुराने मित्राच्या मदतीने १५ वर्षांच्या मुलीसह तिच्या दोन धाकट्या मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक असून १२ तासातच या मुलींची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हसनत रजा जमशेद आलम (वय, १८) आणि मोहम्मद अब्दुल कलाम रहसुद्दीन शेख (वय, १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे बिहार येथील रहिवाशी असून मुंबईतील मालवणी परिसरात मजुरीचे काम करतात. तर, अपहरण झालेल्या मुलींचे वय १५ वर्षे, ७ वर्षे आणि ११ महिने आहे. या मुली त्यांच्या आईसोबत मार्वे रोडच्या खारोडी परिसरात राहतात. तर, त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका बारमध्ये काम करते. 

जवळच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या आलमचे १५ वर्षांच्या मुलीवर प्रेम जडले. आलमने तिला फोन घेऊन दिला आणि दोघेही व्हाट्सअॅपवर चॅटिंग करू लागले. मुलीच्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती. बुधवारी आई नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामावर गेली. परंतु, ती मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतली, तेव्हा तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि तिच्या तिन्ही मुली बेपत्ता असल्याचे समजले. घाबरलेल्या आईने सर्वप्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली.  चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की मोठी मुलगी आलमच्या संपर्कात होती, जो देखील बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.यानंतर पोलिसांनी आलमचा मित्र मोहम्मदला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वसई रेल्वे पोलिसांनी मुलींचे फोटो प्रसारित झाल्यानंतर गुरुवारी सकाळी वसई स्टेशनवर मुलींना शोधून काढले. रेल्वे पोलिसांनी त्यांना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान, आलमने कबूल केले की, तो १५ वर्षांच्या मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. आलमने तिला पळून जाऊ, असे म्हटले. पंरतु, दोन धाकट्या बहि‍णींना घरात एकटे सोडून जाता येणार नाही, असे बोलून तिने पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर आलमने तिघांनाही सोबत नेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमहाराष्ट्रमुंबई पोलीसअपहरण