मुंबई लोकल वाहतूक सुरु करण्याची तयारी; राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा - रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:53 IST2020-08-28T03:20:37+5:302020-08-28T06:53:12+5:30
राज्य सरकारने परवानगी दिल्यास लोकल सोडणार

मुंबई लोकल वाहतूक सुरु करण्याची तयारी; राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा - रेल्वे
मुंबई : राज्य सरकारने परवानगी दिल्यास मुंबईतील लोकल वाहतूक सुरू करण्याची तयारी असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी माध्यमांशी बोलताला सांगितले. राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल सेवा त्वरित सुरू करू, मात्र गर्दी कमी करण्यासाठी खासगी तसेच सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. त्यासाठी क्युआर कोड असलेले ओळखपत्रही वितरित केले आहेत. कोरोना काळात शारिरिक अंतराचे नियम पाळत लोकल सेवा चालविण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळा बदलल्यास गर्दी कमी करता येईल. कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला असून लवकरच राज्य सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास बदललेल्या कार्यालयीन वेळांनुसार लोकलचे वेळापत्रकही तयार करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे.