Join us

Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:06 IST

Mumbai rain Local Train Update: सोमवारनंतर मंगळवारीही पावसाचा जोर कायम असून, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकल रेल्वेची सेवा पूर्णपणे कोलंमडली आहे. 

Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील जनजीवन कोलमडले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असून, मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लापर्यंतची लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पाऊस आणि वाहतूक असा दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

भारतीय हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नवी मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढला. 

LIVE: मुंबईत पावासाचा हाहाकार, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प

Posted by Lokmat Mumbai on Tuesday, August 19, 2025

मध्य रेल्वे: ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा रद्द

पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्यामुळे आणि दृश्यमानताही कमी झाल्याने मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रुळावरील पाण्याचा निचरा होईपर्यंत सेवा बंद असणार आहे. 

सध्या ठाण्यावरून कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या सुरू असून, कल्याणकडून येणाऱ्या लोकल ठाण्यापर्यंत सुरू आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस आणि स्थानक प्रशासनाकडून याची माहिती दिली जात आहे. 

हार्बर मार्ग लोकल बंद 

मध्य रेल्वेने चुनाभट्टी आणि इतर काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे सेवा बंद केली आहे. पाण्याचा निचरा होईपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार आहे. 

दरम्यान, मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर मानखुर्द ते पनवेल दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईचा पाऊसमध्य रेल्वेहार्बर रेल्वेहवामान अंदाज