Mumbai Local Train Crime News: मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. पण याच लोकल ट्रेनमध्ये अनेक वेळा धक्कादायक प्रकार घडल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये लोकलमधील वादातून एकाने दुसऱ्याला भोसकले होते. त्यानंतर आता, आणखी एका किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या घटनेत झाल्याची एक भयंकर घटना समोर आली. वांद्रे रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांच्या वादात एका अज्ञाताने दुसऱ्यावर फेकलेला दगड तिसऱ्याच तरुणाला लागून त्या प्रवाशाचा एक डोळा कायमचा निकामी झाला. निशांत रत्नाकुमार खत्री (२८) असे त्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?:
निशांत रत्नाकुमार खत्री दादरचा रहिवासी आहे. निशांतने एमबीए (MBA) केले असून तो एका खासगी कंपनीत अकाउंट्स विभागात काम करतो. बुधवारी रात्री १०:४० च्या सुमारास निशांत अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकलने घरी परतत होता. डब्यात दोन प्रवाशांमध्ये कशावरून तरी जोरात भांडण सुरू होते. ट्रेन रात्री ११ च्या सुमारास वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पोहोचली. तेव्हा भांडण करणाऱ्यांपैकी एक जण खाली उतरला आणि त्याने रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून डब्यात असलेल्या दुसऱ्या प्रवाशावर फेकला. पहिला दगड ट्रेनला लागला, पण त्याने दुसरा दगड पुन्हा जोरात फेकला. हा दुसरा दगड त्या प्रवाशाला न लागता तिथे बसलेल्या निशांत खत्रीच्या डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला. यामुळे निशांतचा डोळा रक्तबंबाळ झाला.
वेळीच मदत न मिळाल्याने नुकसान
निशांतने दिलेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत कोणीही त्याची साखळी ओढून मदत केली नाही. त्याला स्वतः चालत स्टेशन मास्तरांच्या ऑफिसपर्यंत जावे लागले. तिथेही त्याला ४५ मिनिटे ताटकळत बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला भाभा रुग्णालय आणि नंतर हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला इतका विलंब झाला की डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी आता परत येऊ शकत नाही.
निशांतचे म्हणणे काय?
"मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. लवकरच माझा साखरपुडा होणार होता, पण या एका घटनेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे," अशा शब्दांत निशांतने आपली कैफियत मांडली.
पोलीस कारवाई
वांद्रे रेल्वे पोलिसांनी (GRP) या प्रकरणी अज्ञात प्रवाशाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
Web Summary : A man lost his eye at Bandra station after being hit by a stone thrown during a fight between two passengers. Delayed medical assistance worsened his injury. Police are investigating.
Web Summary : बांद्रा स्टेशन पर दो यात्रियों के झगड़े में फेंके गए पत्थर से एक व्यक्ति ने अपनी आंख गंवा दी। चिकित्सा सहायता में देरी से उसकी चोट और बढ़ गई। पुलिस जांच कर रही है।