कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 07:30 IST2020-01-20T07:29:41+5:302020-01-20T07:30:16+5:30
महिलांमध्ये दिवसाला कृत्रिम साखरेचे सेवन २०.२ ग्रॅम असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ १८.७ ग्रॅम आहे, तर मुंबईत हे प्रमाण यापेक्षा वेगळे दिसून येते.

कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर
स्नेहा मोरे
मुंबई : देशातील सात मेट्रो शहरांतील नागरिक कृत्रिम साखरेचे सेवन करतात, त्यात पुरुषांच्या तुलनेत महिला कृत्रिम साखर अधिक खात असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्तराचा विचार करता, या अॅडेड म्हणजेच कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर असून, सर्वात कमी साखर हैदराबादचे नागरिक खात असल्याचे निरीक्षण नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालात मांडले आहे.
हा अभ्यास अहवाल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि इंटरनॅशनल लाइफ सायन्स इन्स्टिट्यूट-इंडिया यांच्या साहाय्याने केला आहे. या अहवालातील सकारात्मक बाब म्हणजे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ज्ञांनुसार दिवसाला ३० ग्रॅम साखर खाल्ली पाहिजे. मात्र, या अहवालातील साखरेचे सरासरी प्रमाण पाहता, हे केवळ १९.५ ग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.
याविषयी इंटरनॅशनल लाइफ सायन्स इन्स्टिट्यूट-इंडियाचे अध्यक्ष प्रा.पी.के. सेठ यांनी सांगितले की, अहमदाबाद आणि मुंबईतील नागरिकांचे दिवसाला साखर खाण्याचे प्रमाण सरासरी २६.३ ग्रॅम आहे. तर दिल्ली २३.२ , बंगळूरु १९.३, कोलकाता १७.१ आणि चेन्नई १६.१ ग्रॅम हे प्रमाण आहे. असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास अहवाल महत्त्वाचा आहे. सात शहरांतील सरासरी प्रमाण काढले असता, महिलांमध्ये दिवसाला कृत्रिम साखरेचे सेवन २०.२ ग्रॅम असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ १८.७ ग्रॅम आहे, तर मुंबईत हे प्रमाण यापेक्षा वेगळे दिसून येते. मुंबईकर महिला दिवसाला २८ ग्रॅम कृत्रिम साखर खातात, तर पुरुष २४.४ ग्रॅम साखर खातात.
तरुण व ज्येष्ठांचे अधिक सेवन
वयोगटानुसार या कृत्रिम साखरेच्या सेवनाचे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले आहे. त्यानुसार, तरुण पिढीत आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अन्य वयोगटांच्या तुलनेत या कृत्रिम साखरेचे अधिक सेवन होत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. ३६ ते ५९ वयोगटांत दिवसाला २०.५ ग्रॅम, ६० पेक्षा अधिक वयोगटात २०.३ ग्रॅम, तरुणाईत १९.९ ग्रॅम आणि १८ ते ३५ वयोगटांत १९.४ ग्रॅम साखर खाल्ली जात आहे, तर शालेय वयोगटातील मुले-मुली १७.६ ग्रॅम दिवसाला साखर खात असल्याचे अहवालात म्हटले आहे.