KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:03 IST2025-06-17T16:01:02+5:302025-06-17T16:03:37+5:30
Mumbai Rain: हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबत नाही, अशी माहिती केईएम रुग्णालयाने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
मुंबई: गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात केईएम रुग्णालयाच्या आवारात पाणी साचले होते आणि त्याचा तातडीने निचरा झाला. हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबत नाही, अशी माहिती केईएम रुग्णालयानेउच्च न्यायालयाला सोमवारी दिली. गेल्या महिन्यात २६ मे रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवारात पाणी साचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली.
त्यानंतर न्यायालयाने मुंबई महापालिकेला हॉस्पिटलची पाहणी करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले होते. सोमवारच्या सुनावणीत हॉस्पिटलने मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र दाखल केले. हॉस्पिटलच्या कोणत्याही भागात पाणी तुंबत नाही. २६ मे रोजी जोरदार मुसळधार पावसामुळे हॉस्पिटलच्या आवारात पाणी साचले, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
रुग्णावर उपचार करण्यात येणा-या कोणत्याही भागात पाणी साचले नव्हते. जेणेकरून त्यांना प्रतीक्षा करावी लागली, असाही दावा हॉस्पिटलने केला. ‘हॉस्पिटमधील रुग्ण घोट्यापर्यंत आलेल्या पाण्यात बसले होते, असे वृत्त ‘दिशाभूल’ करणारे नव्हते, तर विसंगतही होते, असे केईएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पुन्हा अशी घटना घडणार नाही
मुसळधार पावसातही वॉर्ड, रेडिओलॉजी विभाग, एक्सरे रूम यांसारख्या सेवांवरही परिणाम झाला नाही. हॉस्पिटलच्या आवारात पाणी साचले होते, तेव्हाही १९ एमआरआय, १२० सीटी स्कॅन आणि २७० एक्सरे करण्यात आले, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पाणी तुंबण्याचे कारण जाणण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपायोजना आखण्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी हॉस्पिटलची पाहणी केली. पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर हॉस्पिटलने बसविलेल्या अतिरिक्त सक्शन पंपामुळे साचलेले पाणी कमी झाले. पुन्हा अशी घटना घडणार नाही, याची खात्री हॉस्पिटल प्रशासन करेल, अशी हमी हॉस्पिटलने दिली.