Join us

Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 07:02 IST

Mumbai Rain Updates: मुंबईत सोमवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला.

मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी रात्री ऊशिरापर्यंत अधून-मधून मुंबई शहरासह उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची अक्षरश: धावपळ उडाली. विशेषत: सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईला ब्रेक लागतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली. मात्र ६ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी सकाळपर्यंत मुंबई शहरात १००.४ व उपनगरात ८६ मिमी पाऊस पडला असून, ठिकठिकाणी घडलेल्या पडझडीमुळे तीनजण जखमी झाले.

सोमवारी सकाळी ११ च्या सुमरास अंधेरी कुर्ला रोडवर ताकपाडा येथे झाड पडून जय बासू हे जखमी झाले. सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुपारी पावणे एक वाजता जोगेश्वरी पूर्वेकडे इस्माईल युसुफ कॉलेजजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परांचीचा काही भाग कोसळला. यात दोन महिला जखमी झाल्या. जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअरमध्ये त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर सुगंधा कदम यांना उपचार करून सोडण्यात आले तर अर्लीन पॉल यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे  अंधेरी सब वे दुपारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस रोडवर शीतल सिग्नल या सखल परिसरात पावसाचे पाणी साचले होते. पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, चेंबूर, कुर्ला या परिसरात पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. सोसाटयाच्या वाऱ्यासोबत पडणाऱ्या मोठ्या पावसामुळे मुंबईकरांना छत्रीचा काहीच फायदा होत नव्हता.

पहाटेच्या कोसळधारामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी-पालकांचे हाल झाले. तर नोकरदारांची रिक्षा, टॅक्सी आणि लोकल पकडताना कसरत करावी लागली. सकाळी नऊ-दहानंतर पावसाचा जोर किंचित कमी झाला आणि मुंबईचा वेग वाढू लागला. दुपारी दोननंतर दाटून आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी मोठ्या पावसाची वर्दी दिली. सोसाटयाच्या वाऱ्यासोबत दाखल झालेल्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला झोडपून काढले. मध्य मुंबईसह पूर्व उपनगरात सायंकाळी पाच पर्यंत पडलेल्या पावसाने कार्यालय सोडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.  

सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी  ६ येथे पडला मोठा पाऊस कुलाबा- ५०  मिमी पाऊसनरिमन पॉइंट- ४७ मिमी पाऊसमुंबई सेंट्रल- ४३ मिमी पाऊसपवई    ६८ मिमी पाऊसकुर्ला    ६२ मिमी पाऊसमानखुर्द- ५६ मिमी पाऊसबीकेसी- ९२ मिमी पाऊससांताक्रूझ- ८५ मिमी पाऊस

येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट आहे. रायगड, पुणे घाट, सातारा घाट परिसराला रेड अलर्ट आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्ट आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेले हे इशारे मंगळवारी दोन वाजेपर्यंत असतील, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

टॅग्स :पाऊसमुंबईमहाराष्ट्र