मुंबई पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड समृद्ध; काॅंक्रीटचे नव्हे, खराेखरीचे जंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 09:49 AM2023-12-04T09:49:30+5:302023-12-04T09:49:45+5:30

मुंबई परिसरात नोंदविले गेलेले ३५२ प्रकारचे पक्षी, २११ प्रकारची फुलपाखरे, ३७ प्रकारचे साप हे सर्व याच गोष्टींची खात्री पटवितात.

Mumbai is rich in environmental terms; A real forest, not a concrete one | मुंबई पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड समृद्ध; काॅंक्रीटचे नव्हे, खराेखरीचे जंगल

मुंबई पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड समृद्ध; काॅंक्रीटचे नव्हे, खराेखरीचे जंगल

अविनाश कुबल, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक 

महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली आपणा सर्वांची लाडकी मुंबई महानगरी पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड समृद्ध आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वांत जास्त समृद्ध असलेल्या १२ स्थळांपैकी एक म्हणजेच आपला पश्चिम घाट, याच पश्चिम घाटामध्ये मुंबई वसलेली आहे. प्रचंड पाऊस आणि सोबत सुपीक जमिनीने युक्त अशा पश्चिम घाटातील सदाहरित, निम्न सदाहरित, आर्द्र आणि शुष्क पानगळीची, तसेच गवताळ अशा विविध प्रकारच्या समृद्ध जंगलांनी मुंबई महानगर प्रदेश वेढलेला आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या आसपासच्या प्रदेशात वाहणाऱ्या गोड्या पाण्याचा प्रवाह असलेल्या तानसा, वैतरणा, काळू, उल्हास तसेच गाढी आणि पाताळगंगा अशा नद्या, त्या नद्यांच्या पात्रात तयार झालेली अथवा तयार करण्यात आलेली धरणे, त्यामुळे समृद्ध झालेली शेती, सोबतच या सर्व नद्यांच्या मुखावर निर्मित झालेली समृद्ध कांदळवने तसेच चिखलाचे आणि वाळूचे समुद्र किनारे... अशा सर्व विविध प्रकारच्या परिसंस्थांनी युक्त मुंबई शहर खूप मोठ्या जैवविविधतेला आधार देते. विविध प्रकारच्या वनस्पतीसृष्टीचे प्रकार आणि त्यावर आधारित कीटक, प्राणी, पक्षी तसेच अनेक प्रकारचे इतर प्राणी हे मुंबई प्रदेशाचे वैभव आहे. पट्टेरी वाघांचे अस्तित्व सिद्ध झालेले नसले तरीही बिबट्याचे अस्तित्व मात्र ठळकपणे दिसून आलेले आहे. विविध प्रकारची फुलपाखरे, पक्षी, सरीसृप, जलचर, प्राण्यांचे अस्तित्व मुंबईच्या जैवविविधतेची ग्वाही देतात.

मुंबई परिसरात नोंदविले गेलेले ३५२ प्रकारचे पक्षी, २११ प्रकारची फुलपाखरे, ३७ प्रकारचे साप हे सर्व याच गोष्टींची खात्री पटवितात. आपल्या अवाढव्य आकाराने आपल्याला स्तिमित करणारे बाओबाब, पर्जन्य वृक्ष, फुलल्यावर आपल्या निसर्ग सौंदर्याने भारावून टाकणारे अनेक प्रकारचे वृक्ष, त्यामध्ये खास म्हणजे बहावा, मुंबईत लाखोंच्या संख्येने येणारे अग्निपंख पक्षी, जवळपास वेळापत्रकानुसार हजेरी लावणारा तिबोटी खंड्या हे सुद्धा मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देणारे शिलेदार. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होणारे नागरिकीकरण आणि शहरीकरण मुंबईला जैवविविधतेपासून मिळणाऱ्या अनेक लाभांपासून वंचित ठेवते, असे दिसून येते. शहरामध्ये निर्माण होणारा कचरा, सांडपाणी यांची नैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यास आपली उपलब्ध जैव-विविधता खूपच तोकडी पडत असल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. आपल्या अनेक नैसर्गिक आपत्तीचे मूळ जैवविविधतेच्या ऱ्हासामध्ये दडलेले आहे, याची जाणीवसुद्धा आपण विसरत चाललो आहोत.

मुंबई महानगर प्रदेशातील वृक्षराजी तसेच अन्य सर्व प्रकारची जैव-विविधता नष्ट होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. विविध प्रकारच्या विकास प्रकल्पासाठी झाडे असलेल्या जागा वापरात आणल्या जातात. ठरावीक प्रजातींची झाडे आणि वनस्पतींची लागवड आणि जोपासना केल्यामुळे एकसुरीपणा आला आहे. वृक्षराजी आणि वनस्पती सृष्टीतील वैविध्य नष्ट झाले आहे. विविध प्रकारच्या उपाययोजनांनी त्यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते.

Web Title: Mumbai is rich in environmental terms; A real forest, not a concrete one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल