"एखाद्या घटनेमुळे मुंबईला..."; अरविंद केजरीवालांच्या टीकेला CM देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:42 IST2025-01-16T18:39:57+5:302025-01-16T18:42:08+5:30
Saif Ali Khan Attacked News in Marathi: अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेबद्दल टीका केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

"एखाद्या घटनेमुळे मुंबईला..."; अरविंद केजरीवालांच्या टीकेला CM देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attacked: प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेने खळबळ माजली. सैफ अली खान या घटनेत जखमी झाला असून, घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली. केजरीवाल यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले.
"मुंबईत घडलेली ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या लोकांचे भाजपचे डबल इंजिन सरकार सुरक्षा करू शकत नाही, तर मग सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षेबद्दल काय बोलायचं?", अशी टीका केजरीवाल यांनी महायुती सरकारवर केली.
देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवालांना काय दिले उत्तर?
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे मुंबईला असुरक्षित शहर म्हणणं चुकीचं आहे. मुंबई महानगर आहे आणि सुरक्षित शहर आहे."
"हल्ला करण्याचा उद्देश काय असावा, याबद्दल माहिती दिली गेली आहे. देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे. काही घटना घडतात, त्यांना गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. पण, त्यामुळे मुंबईला असुरक्षित शहर म्हणणं योग्य नाही. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपासासाठी टीम नियुक्त करण्यात आले आहे", असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.