मुंबई : उत्तर भारतासह गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात येत आहे. तेथील तप्त वारे मुंबईकडे वाहत आहेत. याच तप्त वाऱ्यांमुळे आता महामुंबईमधील शहरे तापली आहेत. महामुंबईतील सोमवारचा दिवस ‘ताप’दायक होता. तर हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार आज मंगळवारीही महामुंबई तापणार आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश होते. त्यामुळे मुंबईकरांना तुलनेने कमी चटके बसत होते. मात्र आर्द्रता ८० टक्क्यांवर होती. त्यामुळे दिवस-रात्री घामाच्या धारा वाहत होत्या.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह आसपासची शहरे तापली होती. कमाल तापमान ४० अंशांपार पोहोचले होते.
मुंबईतील तापमानाचा अंदाज काय?
शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मंगळवारी उष्ण व दमट हवामान राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २४ च्या आसपास असेल.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४० किमी वेगाने वारे वाहतील.