Mumbai: तपासणी मराठा आंदोलकांची, कोंडी सर्वसामान्यांची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:52 IST2025-09-02T14:48:22+5:302025-09-02T14:52:02+5:30
मराठा आंदोलकांची वाहने परत पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मानखुर्द जकात नाका येथे नाकाबंदी सुरू आहे.

Mumbai: तपासणी मराठा आंदोलकांची, कोंडी सर्वसामान्यांची!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा आंदोलकांची वाहने परत पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मानखुर्द जकात नाका येथे नाकाबंदी सुरू आहे. मात्र, वाशी खाडीपुलाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या वेशीवर वाहनांची तपासणी सुरू असल्याने तिसऱ्या दिवशीही नागरिकांना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागले. याचा त्रास कामानिमित्त मुंबईत प्रवेश करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
न्यायालयाने पाच हजार आंदोलकांना मुंबईतील आझाद मैदानावर येण्यास अनुमती दिली आहे. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी हजारो आंदोलकांनी वाहनांसह मुंबईत शिरकाव केला. यामुळे मुंबईतले अनेक रस्ते जाम झाल्यानंतर पोलिसांकडून मुंबईच्या प्रवेश मार्गांवर आंदोलकांची वाहने अडवण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलकांना रेल्वेने मुंबईत प्रवेशाचा मार्ग खुला असला, तरी त्यांची वाहने अडवण्यात येत आहेत.
चार-पाच किमीच्या रांगा
वाशी खाडीपुलाच्या उतारालाच मुंबईच्या वेशीवरच पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात असून, वाहनांची झाडाझडती सुरू आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करून त्यात आंदोलक आहेत का? याची खातरजमा केली जात आहे. आंदोलकांचे वाहन आढळल्यास परत वाशीकडे पाठवले जात आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत.