डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:00 IST2025-11-17T14:37:19+5:302025-11-17T15:00:35+5:30
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार
Mumbai Crime: मुंबईत तीन अल्पवयीन मुलांमुळे एका ३३ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. बदनामी आणि ब्लॅकमेलिंगच्या एका धक्कादायक प्रकारात कुर्ला येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी व्ही. बी. नगर पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे ब्लॅकमेलिंगचा कट रचणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डेटिंग ॲपवरून रचला 'ब्लॅकमेल'चा कट
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी पोलिसांना कुर्ला येथील एका इमारतीमधून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली होती. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृतदेह विद्याविहार येथील कुटुंबाकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी, आत्महत्या करण्यापूर्वी चार तरुण त्या इमारतीकडे जाताना दिसले. पोलिसांनी या चौघांना बोलावून त्यांची चौकशी केली. यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुरुवातीला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली, ज्यामुळे पोलिसांना संशय आला.
सखोल तपासानंतर पोलिसांनी ब्लॅकमेलिंगच्या या भयानक कटाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा डेटिंग ॲपवरून ३३ वर्षीय मृताच्या संपर्कात आला होता. मृत तरुण समलैंगिक असल्याने, तो लैंगिक संबंधांसाठी पैसे देण्यास तयार असल्याचे या अल्पवयीन मुलाने दुसऱ्या व्यक्तीला सांगितले होते. अल्पवयीन मुलाने एका दुसऱ्या तरुणाचा फोटो मृताला पाठवला आणि त्याला कुर्ल्यामध्ये एका ठिकाणी बोलावले.
ब्लॅकमेलिंगसाठी क्रूर मारहाण
जेव्हा मृत तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता त्याच वेळी आरोपी अल्पवयीन मुलगा आणखी दोन साथीदारांना घेऊन तिथे पोहोचला. त्यांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन आरोपीने तिथेच बीअरची बाटली फोडली आणि मृताच्या समलैंगिक संबंधांची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने त्रस्त झालेल्या तरुणाने आरोपीकडे गयावया केली, पण आरोपीने त्याचे ऐकले नाही. मानसिक दबावामुळे आणि भीतीपोटी ३३ वर्षीय तरुणाने खोलीच्या खिडकीतून पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि आपले जीवन संपवले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु केली आहे.