मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा १४% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त ११,२०० घरांचे सौदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:44 IST2025-11-02T13:42:51+5:302025-11-02T13:44:36+5:30
यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा १४% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त ११,२०० घरांचे सौदे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये ११ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात १४ टक्क्यांची घट नोंदली. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपाने दिसून आला.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली होती. त्याद्वारे राज्य सरकारला १२०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
यंदा ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. वास्तविक, या सणामध्ये गृहविक्रीला चालना मिळणे अपेक्षित होते.केवळ गेल्या वर्षीच्याच नव्हे, तर गेल्या महिन्याच्या अर्थात सप्टेंबर २०२५ च्या महिन्याच्या तुलनेतदेखील ऑक्टोबर २०२५ या महिन्यात मालमत्ता विक्रीमध्ये ७ टक्क्यांची घट झाली. सप्टेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार ७० मालमत्तांची विक्री झाली होती. मात्र, ज्या मालमत्तांची विक्री झाली आहे त्यामध्ये ८० टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, २० टक्के मालमत्ता या कार्यालयीन, तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. हा ट्रेंड कायम राहिल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षात मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १४१ मालमत्तांची विक्री झाली.