नॅशनल पार्कच्या संरक्षणासाठी ‘समिती’; तीन महिन्यांत अहवाल देण्याचे हायकोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:20 IST2025-10-24T10:19:48+5:302025-10-24T10:20:48+5:30
ही समिती तीन दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करील.

नॅशनल पार्कच्या संरक्षणासाठी ‘समिती’; तीन महिन्यांत अहवाल देण्याचे हायकोर्टाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचलत, मुंबई उच्च न्यायालयाने चार सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ही समिती तीन दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करील.
या समितीचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. डी. बी. भोसले आहेत. तर सदस्यांमध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर, माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांचा समावेश आहे.
काय म्हटले याचिकेत?
सम्यक जनहित सेवा संस्था यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर समिती स्थापण्याचा आदेश न्यायालयाने दिले. याचिकेनुसार, १९९७ पासून उद्यानाच्या संरक्षणासाठी दिलेले अनेक निर्देश आजतागायत प्रभावीपणे राबविण्यात आलेले नाहीत. मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी असलेले १०४ चौ.किमी क्षेत्रफळाचे हे उद्यान मुंबई व ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबई, ठाण्याचे ‘मुकुटमणी’
मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदविले की, उद्यानाच्या १५४ किमी सीमाभिंतीपैकी फक्त ४९ किमी भिंत उभी करण्यात आली आहे. या विलंबामुळे कदाचित आणखी अतिक्रमण झाले असावे. हे उद्यान ‘अद्वितीय’ असून मुंबई व ठाण्याचे ‘मुकुटमणी’ असे संबोधले आहे.
अवमान कारवाईचा इशारा
समितीच्या अध्यक्षांना एका बैठकीसाठी १ लाख रुपये, तर सदस्यांना ५५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. न्यायालयाने सर्व शासकीय यंत्रणांना समितीला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले असून, आदेशांचे पालन न झाल्यास अवमान कारवाईचा इशारा दिला. न्यायालयाने पुढील सुनावणी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ठेवली आहे.
दुचाकीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) रविवारी झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. मनसी यादव असे बालिकेचे नाव असून, ती कुटुंबियांसह उद्यानात फिरायला आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, यादव कुटुंब राष्ट्रीय उद्यानातील धरणापासून वाघांच्या पिंजऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या छोट्या खडकावर बसले होते. त्यावेळी मनसी जवळच खेळत होती. अचानक सुसाट आलेल्या दुचाकीस्वाराची मानसीला धडक बसली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पळालेला चालक विनोद कवळे (३७) याला ताब्यात घेतले. मानसी पालकांसोबत नवी मुंबईत राहत होती. तिचे वडील सुजीतकुमार यादव (३०) हे ट्रक चालक आहेत, तर आई राजकुमारी (३०) गृहिणी आहे. मनसीला प्राणी, विशेषतः वाघ आणि सिंह पाहण्याची खूप आवड होती.