Join us  

रात्रीच्या पावसाची मुंबईत तुफान बँटिंग; पुढचे दोन ते तीन तास पाऊस कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 10:09 PM

Heavy Rain : बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठळक मुद्देबुधवारी बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : मंगळवारी दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र मुंबईकरांना गाठलेच. रात्री आठच्या सुमारास मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना मुंबईकरांना धडकी भरविली. बुधवारी देखील मुंबईत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, ९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.

मंगळवारी पहाटे पावसाने किंचित हजेरी लावली.  सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत अधून मधून पावसाची हजेरी लागत असतानाच काही ठिकाणी ऊनंदेखील कानोसा घेत होते. दुपारी दोनच्या सुमारास काही अंशी संमिश्र हवामान असताना संध्याकाळी पुन्हा मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले. पण पावसाचा काही पत्ता नव्हता. रात्री मात्र पावसाने चांगलाच काळोख केला. सात वाजता किंचित सुरु झालेल्या पावसाने आठ वाजता मात्र आपला जोर वाढविला. साडे नंतर यात आणखी भर पडली. नऊ वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस अक्षरश: कोसळला. साडे नऊ वाजेपर्यंत पाऊस कोसळत असतानाच विजांचा कडकडाटदेखील सुरु होता.

टपोरे थेंब धो धो कोसळत असतानाच दुसरीकडे पावसाचे पाणी वेगाने मुंबईच्या रस्त्यांहून वाहत होते. पावसाचा मारा प्रचंड असल्याने पाण्याचा लोंढयाचा वेग वाढतच होता. रात्री आठपासून पावसाचा वेग वाढल्याने मुंबईला किंचित ब्रेक लागला. रस्त्यांवर वाहनांऐवजी पाऊस धावू लागला. वाहनांचा वेग कमी झाला. काही अंशी का होईना रस्ते रिकामे झाले. रात्री दहाचे वाजत आले तरीदेखील मुंबईत सुरु झालेला पावसाचा मारा कायम असल्याचे चित्र होते.

बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर अद्यापही कायम असून, याचा परिणाम म्हणून बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ९ सप्टेंबरपासून मात्र पावसाचा मारा कमी होईल. बुधवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. शिवाय घाट भागातदेखील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रपाऊसहवामान