मुंबईला ३५९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा ! १ ऑक्टोबरला सात धरणांमध्ये ९८ टक्के जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:26 IST2025-10-02T13:26:24+5:302025-10-02T13:26:43+5:30
मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.

मुंबईला ३५९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा ! १ ऑक्टोबरला सात धरणांमध्ये ९८ टक्के जलसाठा
मुंबई :मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. १ ऑक्टोबरला सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार सातही धरणांमध्ये १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (९८.७० टक्के) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे हा साठा ३५९ दिवस पुरेल, असा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईला अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतील पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (एक लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर) पाणीसाठा जमा झाला आहे. जुलैपासून या सर्व धरणांतील पाणीसाठा हा मागील दोन वर्षांच्या तुलनेत दुपटीने पुढे होता. त्यामुळे काही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती.
शेवटच्या तीन ते चार दिवसांत धरण क्षेत्रांत पाऊस न पडल्याने धरणांतील साठा जो २७ सप्टेंबरला जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७ सप्टेंबरला या सर्व धरणांतील पाणीसाठा ९९.१३ टक्के एवढा होता, तो आता कमी होऊन १ ऑक्टोबरला ९८.७० टक्क्यांवर आला आहे.
१ ऑक्टोबरचा मागील तीन वर्षांतील पाणीसाठा
२०२५ : ९८.७०% (१४,२८,५४९ दशलक्ष लि.)
२०२४ : ९९.३७% (१४,३८,२२७ दशलक्ष लि.)
२०२३ : ९९.१८% (१४,३५,४५९ दशलक्ष लि.)
धरणांनिहाय १ ऑक्टोबरची नोंद
धरण पाणीसाठा टक्के(दशलक्ष लिटर)
अपर वैतरणा २,२६,०८३ ९९.५८
मोडकसागर १,२८,९२५ १००
तानसा १,४३,२९९ ९८.७७
मध्य वैतरणा १,९२,८२५ ९९.६४
भातसा ७,०१,६७३ ९७.८६
विहार २७,६९८ १००
तुळशी ८,०४६ १००