Join us

वरुणराजा फॉर्मात; 2 दिवसांच्या दमदार बॅटिंगनं महिन्याचा 97% कोटा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 09:29 IST

दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई: अपेक्षेपेक्षा उशिरा मुंबईत दाखल झालेल्या मान्सूननं गेल्या दोन दिवसात दमदार बॅटिंग केली आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये जून महिन्याचं टार्गेट वरुणराजानं पूर्ण केलं आहे. जूनमधील सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेता यंदा 97 टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे हा पाऊस गेल्या दोन दिवसांमध्ये बरसला आहे. शनिवारी रात्री 8.30 पर्यंत भारतीय हवामान खात्यानं मुंबईत 234.8 मिमी पावसाची नोंद केली. 2015 पासून जून महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. 19 जून 2015 रोजी मुंबईत 283.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवसात 204.5 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तो अतिशय जास्त समजला जातो. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये ठाण्यात 237.5 मिमी, तर नवी मुंबईत 245.2 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्ये मुंबई 234.8 मिमी पाऊस झाला. जूनमध्ये सरासरी 505 मिमी पाऊस होतो. त्यापैकी 46 टक्के पाऊस फक्त गेल्या 24 तासांमध्ये झाला. गुरुवारपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईत 491.4 मिमी पाऊस झाला आहे. जूनमधील सरासरी पावसाचा विचार केल्यास या पावसाचं प्रमाण 97 टक्के इतकं आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे.  

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊस