Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:06 IST2025-11-27T15:03:59+5:302025-11-27T15:06:53+5:30
Mumbai Crime News: मुंबईतील माटुंगामध्ये राहणाऱ्या एका ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गोरेगावमधील एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे एक गंभीर प्रकरण मुंबईत समोर आले आहे. माटुंगा पश्चिममध्ये राहणाऱ्या ७२ वर्षीय भरत हरकचंद शाह यांनी आपल्यासोबत ३५ कोटी रुपयांचा शेअर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. गोरेगाव पूर्वमध्ये असलेल्या ग्लोब कॅपिटल मार्केट लिमिटेड नावाच्या ब्रोकरेज कंपनीने विश्वासाचा गैरफायदा घेत जवळपास ३५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शाह यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्यांना सुरक्षित ट्रेडिंगचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर चार वर्षे शाह आणि त्यांच्या पत्नीच्या डीमॅट खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत राहिले. ओटीपीपासून ते ईमेलपर्यंत सर्व गोष्टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडेच होत्या. त्यामुळे शाह यांना कंपनीकडून काय सुरू आहे, याची कल्पनाच आली नाही.
भरत शाह हे तीन दशकांपासून माटुंगा पश्चिममध्ये राहतात. त्यांचे परळमध्ये एक गेस्ट हाऊस आहे. मागील पाच दशकांपासून ते हे गेस्ट हाऊस सुरू आहे. या गेस्ट हाऊसमध्ये कर्करोग रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक कमी भाडेदरात इथे थांबतात.
१९८४ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वडिलांच्या नावावर असलेले शेअर्स शाह आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित झाले. पण, शेअर बाजाराची शाह आणि त्यांच्या पत्नीला फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी शेअर्सची विक्री केली नाही.
२०२० पासून सुरू झाला खरा खेळ
वर्ष २०२० मध्ये एका मित्राने सल्ला दिल्यानंतर शाह यांनी ग्लोब कॅपिटल मार्केट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले. त्यांच्या नावे असलेले शेअर्स याच खात्यात जमा झाले. सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित होते. त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी सातत्याने संपर्क करू लागले. त्यांनी शाह यांचा विश्वास संपादन केला आणि मार्केटमध्ये आणखी पैसे लावण्याची गरज नसल्याचेही सांगितले.
शेअर ठेवून सुरक्षितपणे विक्री केली जाऊ शकते. त्यातून नियमित नफा मिळेल आणि कंपनीकडून वैयक्तिक मार्गदर्शन आणि मदत केली जाईल, असे त्यांनी शाह यांना सांगितले. शाह यांचा पोर्टफोलिओ सांभाळण्यासाठी कंपनीकडून अक्षय बारीया आणि करण सिरोया या दोघांकडे जबाबदारी देण्यात आली.
सर्व एक्सेस कंपनीने घेतला स्वतःकडे
तक्रारीत म्हटले आहे की, हे दोघे त्यांना नियमित कॉल करायचे आणि कोणते शेअर घ्यायचे याबद्दल सांगायचे. काही काळानंतर कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी येऊन, लॅपटॉपवरून ईमेल पाठवायला लागले. हळूहळू त्यांनी सर्व एक्सेस घेण्यास सुरुवात केली. ओटीपीही तेच टाकू लागले. प्रत्येक मेसेज आणि ईमेलला तेच उत्तर देऊ लागले. शाह यांना मोजकीच माहिती दिली जाऊ लागली. त्यांच्या खात्याचा संपूर्ण एक्सेस कंपनीने स्वतःकडे घेऊन टाकला.
चार वर्षे नफा दिसत राहिला, पण...
मार्च २०२० ते जून २०२४ पर्यंत शाह यांना कंपनीकडून जी स्टेटमेंट दिले जात होते, त्यात सर्व आकडेवारी व्यवस्थित दाखवली जात होती. त्यात नफा मिळत असल्याचे दाखवले जात होते. त्यामुळे त्यांना कधी शंका आली नाही. जुलै २०२४ मध्ये शाह यांना कंपनीच्या व्यवस्थापन विभागाकडून कॉल आला. शाह यांना सांगण्यात आले की, तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या खात्यामध्ये ३५ कोटी रुपयांचे डेबिट बॅलन्स (देणी रक्कम खात्यात असलेल्या पैशांपेक्षा जास्त) आहे. तुम्हाला हे पैसे लवकर भरावे लागतील नाही, तर शेअर विकावे लागतील. कंपनीत गेल्यानंतर शाह यांना कळले की, त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणात व्यवहार केला गेला. कोट्यवधी रुपयांचे शेअर्स विकले गेले. अनेक वेळा एकाच पार्टीसोबत खरेदी विक्री झाली. त्यामुळे खाते तोट्यात गेले.
शेअर विकून ३५ कोटी रुपये भरले
कुटुंबात चर्चा केल्यानंतर शाह यांनी स्वतः त्यांच्या नावे असलेले शेअर विकून ३५ कोटी रुपये भरले. उरलेले शेअर त्यांनी दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी ग्लोब कंपनीच्या वेबसाईटवरून त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट काढले. तेव्हा त्यांना पूर्वी कंपनीकडून दिले गेलेले स्टेटमेंट आणि नव्याने काढलेल्या स्टेटमेंटमधील आकडे वेगवेगळे असल्याचे आढळून आले. कंपनीला एनएईची नोटीस मिळाली होती. त्याचे उत्तर कंपनी शाह यांच्या नावाने दिले होते. पण, त्याची माहितीही शाह यांना दिली गेली नाही.
शाह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, चार वर्षे कंपनीने आम्हाला खोटे आकडे दाखवले. त्यामुळे नुकसान वाढत गेले आणि शेअर विकून ३५ कोटी फेडावे लागले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वनराई पोलीस ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.