Mumbai Four new jumbo Covid centres to be ready by mid May or June | Corona Updates Mumbai: मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

Corona Updates Mumbai: मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

Jambo Covid Center In Mumbai: मुंबईत लवकरच चार नवे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी राज्य सरकारनं केली आहे. "मुंबईत मे महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चार नवे जम्बो कोविड सेंटर तयार झालेले असतील यामुळे याआधीच्या सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी चार सेंटरची भर पडेल", अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (नागरी विभाग) संजीव जयस्वाल यांनी सांगितलं. (Mumbai Four new jumbo Covid centres to be ready by mid May or June)

मुंबईत येत्या महिन्याभरात कांजुरमार्ग, मालाड, सायन आणि महालक्ष्मी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. यातील कांजुरमार्ग कोविड सेंटरमध्ये तब्बल २ हजार बेड्स आणि २०० आयसीयू बेड्सची व्यवस्था असणार आहे, अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली. जम्बो कोविड सेंटर उभारणीसाठी संबंधित एजन्सीसोबत महापालिका संपर्कात असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठीची ही पूर्वतयारी असल्याचंही जयस्वाल म्हणाले. 

जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये याआधीच १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. "गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आता आयसीयू बेड्सची संख्या २०० वर पोहोचली असून कोरोनासाठी सर्वाधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था असणारं देशातील हे पहिलं सेंटर ठरलं आहे. सहा जम्बो कोविड सेंटरसोबतच आपल्याकडे आता ८ हजार सर्वसाधारण बेड्स आणि ५०० आयसीयू बेड्स उपलब्ध झाले आहेत. याशिवाय बीकेसी येतील जम्बो सेंटरच्या विस्तारीकरणाचीही तयारी पालिकेनं केली आहे", असं जयस्वाल यांनी सांगितलं. 

महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील कोविड सेंटरचा वापर होत नसल्यामुळे रिकामी करण्यात आल्याच्या तीनच महिन्यांनंतर आता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कोविड सेंटर उभारण्याचा विचार महापालिका करत आहे. यासाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबनं मदत करावी अशी पालिकेची इच्छा आहे. शुक्रवारपासून पालिकेकडून रेसकोर्सच्या पार्किंग परिसरात तंबू उभारण्यास सुरुवात देखील केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbai Four new jumbo Covid centres to be ready by mid May or June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.