मुंबईतील मानखुर्द परिसरात एका व्यक्तीने मुलगी झोपत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या चेहऱ्यावर पेटत्या सिगारेटचे चटके दिले. शेजाऱ्याने या प्रसंगाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करून तो पोलिसांपर्यंत पोहोचला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
राजेशराम उर्फ भगवान असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसह मानखुर्दच्या करबला मैदानाजवळील वस्तीत राहतो. आरोपी बेरोजगार असून त्याला अमली पदार्थांचे व्यसन आहे. तर, त्याची पत्नी चार घरची धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी आरोपीच्या घरातून त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. त्यावेळी शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता आरोपीने मुलीचे पाय बांधून तिला मारहाण करत होता. त्यानंतर त्याने तिचा गळा आवळला. हे पाहिल्यानंतर शेजारील एका मुलीने आपल्या मोबाईलमध्ये या प्रसंगाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पोलिसांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर मानुखर्द पोलिसांनी ताबडतोब आरोपीचे घर गाठले. परंतु, त्याआधीच आरोपी पसार झाला होता. मात्र, त्याची दोन्ही मुले घरी होती.
पोलिसांनी मुलांना पोलीस ठाण्यात नेले असता मुलीच्या शरीरावर मारहाणीचे व्हाल आणि चेहऱ्यावर सिगारेटने दिलेले चटके आढळले. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले आणि नंतर आईच्या हवाली केले. परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.