Mumbai Farmers Protest Live governor bhagat singh koshyari will return from goa in the evening | Mumbai Farmers Protest: शेतकरी आझाद मैदानात, राज्यपाल गोव्यात; निवेदन देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार

Mumbai Farmers Protest: शेतकरी आझाद मैदानात, राज्यपाल गोव्यात; निवेदन देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार

मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. नाशिकहून आलेला मोर्चा सध्या आझाद मैदानात असून थोड्याच वेळात तो राजभवनावर धडकणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागू शकते.

शेतकऱ्यांचा मोर्चा थोड्याच वेळात राजभवनावर धडकणार आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राजभवनात नाहीत. ते गोव्यात आहेत. कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे राज्यपालांकडून शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला संध्याकाळी पाचची वेळ दिली असल्याचं समजतं. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत आलेले शेतकरी आज मुक्काम करण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? संजय राऊतांनी व्यक्त केला संशय

मुख्यमंत्री ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता धूसर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकरी मोर्चात सहभागी होऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघू नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. शरद पवारांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मोर्चात सहभागी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते आणि मंत्री या मोर्चात सहभागी होतील.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जत्था इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbai Farmers Protest Live governor bhagat singh koshyari will return from goa in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.