मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 18:16 IST2025-12-28T18:16:04+5:302025-12-28T18:16:27+5:30
मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता विविध उपायोजना केल्या जात असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके स्थापन केली आहेत.

मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन
मुंबई : मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता विविध उपायोजना केल्या जात असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणा करिता घेतलेल्या विशेष आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम व सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबई शहरातील जे आर एम सी प्लांट नामनिर्देशित नियमांचे पालन करत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरासाठी चार विशेष तपास पथके तर नवी मुंबई शहरासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. ही विशेष तपास पथके शहरातील आरएमसी प्लांट ना भेट देऊन त्यांची तपासणी करणार आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळून येणाऱ्या प्लांट ना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील चार आस्थापनांवर बंदची कारवाई केली असून एकूण ३७ आर एम सी प्लांट यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी ८७ लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या महिनाभरात करण्यात आली आहे.
शहरातील हवा प्रदूषण नियंत्रण करिता महानगरपालिकेच्या बरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील आता धडक मोहीम हाती घेतली असून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील आणि कठोर प्रसंगी कारवाई देखील केली जाईल, असे सिद्धेश कदम यांनी सांगितले. तर शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून या करिता आस्थापनांना घालून दिलेल्या अटींचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी ही भरारी पथके तात्काळ तपासणीला सुरुवात करणार असल्याचे एम देवेंदर सिंह यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मोजमापन करणारी एकूण ३२ केंद्रे असून मुंबई शहरात १४ केंद्रे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त मोजमापन करणाऱ्या २२ मोबाईल व्हॅन उपलब्ध असून गरजेनुसार ज्या ज्या ठिकाणी हवेचे गुणवत्ता ढासळली जाते त्या ठिकाणी त्याचे तात्काळ मोजमापन या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केले जात आहे.