Mumbai: कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला ठाण्यात गळती! मुंबईत शुक्रवारपासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:31 IST2023-03-28T20:30:44+5:302023-03-28T20:31:27+5:30
Mumbai: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 'जलवाहिनी २'ला मुलुंडमध्ये गळती लागण्याची घटना घडून २४ तास उलटत नाही तोच कुपनलिकेच्या खोदकामामुळे ठाणे येथे जलबोगद्याला गळती लागल्याचा प्रकार मंगळवारी घडला.

Mumbai: कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला ठाण्यात गळती! मुंबईत शुक्रवारपासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात
मुंबई - मुंबईलापाणी पुरवठा करणाऱ्या 'जलवाहिनी २'ला मुलुंडमध्ये गळती लागण्याची घटना घडून २४ तास उलटत नाही तोच कुपनलिकेच्या खोदकामामुळे ठाणे येथे जलबोगद्याला गळती लागल्याचा प्रकार मंगळवारी घडला. जलबोगद्याच्या गळती दुरुस्तीचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्च पासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा ५ हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे. या जलबोगद्याला गळती लागली असून ही गळती रोखण्यासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा खंडित होणार असून मुंबई व पालिकेतर्फे ठाणे शहरास केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मार्च पासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.