Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:43 IST2025-11-25T12:41:14+5:302025-11-25T12:43:13+5:30
Mumbai Drunk Audi Driver News: मुंबईत दुचाकीस्वाराचे अपहरण करून त्याच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली वांद्रे पोलिसांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली.

Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी पहाटे एका दुचाकीस्वाराचे अपहरण करून त्याच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चिराग हरगुनानी असून, घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत महागडी ऑडी कार चालवत होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. चिराग हरगुनानी हा जवळच्या एका पार्ककडे जाण्याचा मार्ग शोधण्याच्या बहाण्याने वांद्र्याजवळ मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांकडे गेला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने मोहम्मद ताबीश शोएब कुट्टी याला विनंती केली की, तो नशेत असल्याने त्याला रस्ता चुकल्यासारखे होत आहे, त्यामुळे त्याने कारमध्ये बसून मार्गदर्शन करावे. मदतीच्या भावनेतून कुट्टीने हरगुनानीला मदत करण्याचे ठरवले आणि तो त्याच्या ऑडी कारमध्ये बसला.
कुट्टी कारमध्ये बसल्यानंतर आरोपी हरगुनानीने कारचे दरवाजे बंद केले आणि कार पुढे नेली. या दरम्यान, त्याने कुट्टी याच्याकडे वारंवार लैंगिक सुखाची मागणी केली. कुट्टीने या मागणीला तीव्र नकार दिला आणि कार थांबवून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. यावर हरगुनानी आक्रमक झाला आणि त्याने चालत्या कारमध्येच कुट्टीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
कुट्टीला कारमधून उतरण्यास किंवा सोडण्यास आरोपीने स्पष्ट नकार दिला. या झटापटीदरम्यान, कुट्टीने प्रसंगावधान राखत कारच्या चाव्या काढण्यात यश मिळवले. कार थांबताच कुट्टी ताबडतोब बाहेर पडला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरित याबाबत पोलिसांना माहिती दिली. वांद्रे पोलिसांनी आरोपी चिराग हरगुनानीला अटक केली असून त्याच्यावर अपहरणासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.