Join us

मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:21 IST

Pitbull Attack Video: एका रिक्षामध्ये ही घटना घडली आहे. मुलावर पिटबुल कुत्रा सोडला आणि त्यानंतर कुत्रा हल्ला करताना पाहून मालक आनंद घेत होता. 

Mumbai Pitbull Attack: रिक्षात मुलं खेळत होती. त्यावेळी एक व्यक्ती पिटबुल कुत्र्याला घेऊन फिरत होता. पिटबुल कुत्रा बघून मुलांना आनंद झाला. ती पिटबुल.. पिटबुल म्हणून ओरडू लागली. मग मालक कुत्र्याला घेऊन रिक्षात शिरला. इतर मुले पळाली, पण एक रिक्षातच अडकला. मालकाने कुत्र्याला त्या मुलावर सोडलं. कुत्रा अंगावर येऊ लागला म्हणून मुलगा ओरडू लागला. कुत्रा मुलाला चावताना पाहून त्याला पकडण्याऐवजी मालक हसू लागला. ही संतापजनक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक यावर संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, कुत्र्याच्या मालकाची ओळख पटली असून, त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मानखुर्दमध्ये ही घटना १७ जुलै (गुरुवारी) रोजी घडली. ११ वर्षाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत एका रिक्षामध्ये खेळत होता. त्यावेळी मोहम्मद सुहैल हसन (वय ४३) हा पिटबुल कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरत होता. कुत्र्याला बघून रिक्षामध्ये खेळणारी मुले पिटबुल... पिटबुल म्हणत आनंदाने आवाज देत होती. 

कुत्रा घेऊन शिरला रिक्षामध्ये आणि...

मुले खेळत असलेल्या रिक्षामध्ये मोहम्मद सुहैल हसन कुत्र्याला घेऊन शिरला. पिटबुलच्या भीतीने मुले पळाली. पण, रिक्षातील सीटच्या पाठीमागे असलेल्या जागेत बसलेल्या मुलाला पळताच आले नाही. 

मालकाने पिटबुलला त्या मुलाच्या जवळ सोडले. पिटबुल कुत्रा ११ वर्षाच्या मुलावर हल्ला करू लागला. त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे मुलगा घाबरून आरडाओरड करत होता. ते बघून मालक हसत होता. 

रिक्षातून पळाला पण कुत्र्याने लचके तोडलेच

पिटबुल कुत्रा चावण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलगा कसाबसा रिक्षातून पडू लागला. तेव्हा कुत्र्याने त्याला पाठीमागून चावले. त्यानंतर मुलगा रिक्षातून उतरून पळाला त्यावेळी कुत्र्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याचे बरेच लचके तोडले. 

लोक व्हिडीओ बनवत राहिले 

काही लोक हा सगळा प्रकार रिक्षातून बाहेर उभे राहून बघत होते. कुत्रा मुलाला चावत असताना कुणीही त्या मालकाला बोलले नाही. उलट लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवले. 

पिटबुलचा मुलावर हल्ला, व्हिडीओ बघा

पिटबुल कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.लोक संताप व्यक्त करत असून, मालकावर कारवाई करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, ज्या मुलाचे पिटबुल कुत्र्याने लचके तोडले. त्याची ओळख पटली आहे. त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मोहम्मद सुहैल हसन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला समन्स बजावले आहे. 

टॅग्स :कुत्राव्हायरल व्हिडिओगुन्हेगारीमुंबई पोलीससोशल मीडिया