मुंबई महाराष्ट्राची नाही... तामिळ भाजप नेत्याच्या विधानावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 07:29 IST2026-01-11T07:11:22+5:302026-01-11T07:29:12+5:30
भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले

मुंबई महाराष्ट्राची नाही... तामिळ भाजप नेत्याच्या विधानावरून वाद
मुंबई : एकीकडे मुंबईचा महापौर मराठी की हिंदू मराठी; मुंबई कुणाची या वादाभोवती मुंबई पालिकेची निवडणूक फिरत असताना त्यात आता आणखी एक वादाची भर पडली आहे. मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करत हे शहर महाराष्ट्राचे नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले आहे.
अण्णामलाई हे तामिळनाडूतील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून, ते निवडणूक प्रचारासाठी मुंबईत आले आहेत. भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे.
काय आहे प्रकरण?
अण्णामलाई म्हणाले की, मुंबईचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटी रुपयांचा आहे, चेन्नईचा अर्थसंकल्प ८ हजार कोटी, तर बंगळुरूचा अर्थसंकल्प १९ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावे लागतील. अण्णामलाई यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे
अण्णामलाई यांना अटक करा : राऊत
अण्णामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला, त्यावर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काय म्हणणे आहे? फडणवीस म्हणतात; सूर्य-चंद्र-तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. पण, तुमचे नेते मात्र अशी वक्त्तव्य करतात. असा अण्णा, भन्ना, झंना, कुणी असो त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे, असे राऊत म्हणाले.