Mumbai CST Bridge Collapse: जखमींना वेदना असह्य; नातेवाईकांना अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 06:08 IST2019-03-16T06:08:18+5:302019-03-16T06:08:30+5:30
गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडून असलेला पादचारी पूल सायंकाळच्या सुमारास कोसळला.

Mumbai CST Bridge Collapse: जखमींना वेदना असह्य; नातेवाईकांना अश्रू झाले अनावर
मुंंबई : गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडून असलेला पादचारी पूल सायंकाळच्या सुमारास कोसळला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू आणि ३७ जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना सेंट जॉर्जेस रुग्णालय आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालय या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींच्या कोणाच्या पायाला, हाताला, कंबरेला फ्रॅक्चर झाले. तर काहींच्या डोक्याला जबर मार लागला आहे. काही जखमींना मुकामार लागला आहे. जखमीच्या वेदना पाहून त्यांना बघण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.
गोकुळदास तेजपाल रूग्णालयात दाखल झालेल्या जयेश अवलानी यांच्या डोक्याला, चेहऱ्याला चारही बाजूने पट्टीने गुंडाळली आहे. जयेश हे डोबिंवली येथे राहणारे आहेत. सीएसएमटी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले असताना पादचारी पुलावरील दुर्घटनेत जखमी झाले. प्रशासन हद्दीच्या वादामुळे कधीपर्यंत मुंबईकरांचा जीव धोक्यात घालणार. अंधेरी गोखले पूलाची घटना, एल्फिन्स्टन रोडची घटना अशा घटनेच्या आठवणी ताज्या असताना पुन्हा एखादी घटना होते. प्रशासन ढिम्म झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या १९ वर्षीय अनिकेत जाधव याच्या कंबरेला जबर मार बसला आहे. त्याला आता उठायला आणि बसायला त्रास होत आहे. अशा इतर अनेक रुग्णांना मार बसला असून, त्यांची अवस्था गंभीर आहे. डॉक्टरांकडून सांगण्यात आले की, जखमींची स्थिती प्रतिकूल आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.