Mumbai Crime News Latest: मुंबई पोलीस दलातील मयत कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलाला अटक झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलीस कर्मचारी प्रवीण शालिग्राम सूर्यवंशी यांचा मे महिन्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्या होत्या, तसेच डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
सायन पूर्वमधील प्रतिक्षानगर पोलीस अधिकारी वसाहतीतील घरात प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांना अटक केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याचा कसा झाला होता मृत्यू?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे सुरूवातीला मानले गेले होते. मात्र, याचा तपास केल्यानंतर पत्नी आणि मुलासोबत वाद झाल्याचा मुद्दा समोर आला.
मे महिन्यात प्रवीण सूर्यवंशी याचा पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत घरात वाद झाला. पत्नी आणि मुलासोबत प्रवीण सूर्यवंशी यांची झटापट झाली. त्यावेळी दोघांनी त्यांना जोरात ढकलून दिले. खिडकीच्या काचेवर जाऊन आदळले.
काच फुटली आणि काचेमुळे त्यांच्या हाताच्या नसा तुटल्या. त्याचबरोबर डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यानंतर त्यांना पत्नी आणि मुलाने रुग्णालयातच नेले नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पत्नी आणि मुलाला अटक केली.