Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:05 IST2025-12-03T10:02:44+5:302025-12-03T10:05:17+5:30
१४ वर्षीय लेक झोपेत असताना पित्याने ब्लेडने गळा चिरला. तिचा आवाज ऐकून वाचावयाला आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला.

Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
मुंबई : स्वत:च्या १४ वर्षीय लेकीचा पित्याने ती झोपेत असताना ब्लेडने गळा चिरण्याची घटना सोमवारी उशिरा रात्री दहिसरमधील कोकणी पाडा येथे घडली. यावेळी तिला वाचवायला गेलेल्या पत्नीवरही आरोपीने ब्लेड हल्ला केला. हनुमंत सोनवळ (वय ३६) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
हनुमंत याला दारूचे व्यसन असून तो पत्नी राजश्री हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिला मारहाण करतो. त्यामुळे तिने वांद्रे कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली आहे.
राजश्री ही नालासोपाऱ्यातील वकिलांकडे घटस्फोटाच्या केसची माहिती घेऊन घरी आल्यानंतर हनुमंतने इतका वेळ कुठे गेली होतीस असे विचारत तिला त्रास दिला तसेच पत्नी आणि मुलीला मारण्याची धमकी देत दिली.
‘शताब्दी’त केले दाखल
मुलगी रात्री झोपत असताना रात्री सव्वादोनच्या सुमारास तिच्या गळ्याजवळ काहीतरी चावल्यासारखे वाटून तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी गळा चिरल्याचे लक्षात आले.
त्यामुळे तिने आरडाओरड केला असता तिला वाचविण्यासाठी आलेल्या राजश्रीच्या पोटावर वार केला. या घटनेनंतर नातेवाइकांनी पोलिसांना कळविले, तर जखमी-मायलेकीना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंतला अटक करण्यात
आली आहे.