टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:47 IST2025-11-23T10:37:34+5:302025-11-24T10:47:59+5:30
Mumbai Crime: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे ...

टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
Mumbai Crime: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनंत आणि डॉक्टर गौरी यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. या घटनेनंतर गौरी यांच्या कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गौरीच्या कुटुंबियांनी अनंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कौटुंबिक कारणातून शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान, गौरी पालवे यांनी वरळी बीडीडी येथे राहत्या घरी गळफास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होते. अनंत यांचे बाहेर संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. याच कारणातून त्यांच्यात वाद होत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे म्हटलं जात आहे. केईएम रुग्णालयातील दंतवैद्य विभागात त्या कार्यरत होत्या. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर गौरी यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "दोघांमध्ये वाद सुरु होते. शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून त्यांच्यात भांडण सुरु होते. अनंतने सांगितले की गौरीने माझ्यासमोर फाशी घेतली. त्यानंतर तो मृतदेह घेऊन रुग्णालयात आला आणि निघून गेला. दोन तीन महिन्यांपासून तो तिला टॉर्चर करत होता. त्याच्या बाहेरच्या संबंधाची तिला माहिती झाली होती. तिने हा विषय सोडून दिला होता. ती चॅटिंग पाहत होती. तिच्या वडिलांनाही तिने ते चॅटिंग पाठवले होते," असं गौरी यांच्या मामाने टीव्ही ९ सोबत बोलताना सांगितले.
या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी आजचा बीड जिल्हा दौरा स्थगित केला आहे. पंकजा मुंडे अनंत गर्जे यांना पुत्रासमान मानत होत्या. गौरी पालवेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले.