१६ संशयितांची डीएनए चाचणी अन् 'त्या' रिपोर्टने पोलीसही हादरले; तरुणीवर अत्याचार करणारा निघाला घरातीलच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:22 IST2026-02-06T09:09:34+5:302026-02-06T09:22:26+5:30
मुंबईत एका मतिमंद मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

१६ संशयितांची डीएनए चाचणी अन् 'त्या' रिपोर्टने पोलीसही हादरले; तरुणीवर अत्याचार करणारा निघाला घरातीलच!
Mumbai Crime: मुंबईतून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका २० वर्षांच्या मतिमंद आणि मूकबधिर तरुणीवर तिच्या पोटच्या पित्यानेच अत्याचार करून तिला गरोदर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील गुंतागुंत सोडवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या डीएनए चाचणीच्या अहवालाने पित्याचा क्रूर चेहरा समाजासमोर आणला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
असा उघड झाला धक्कादायक प्रकार
ही घटना २०२५ मध्ये पहिल्यांदा उघडकीस आली होती. पीडित तरुणी मूकबधिर असून तिला मानसिक आजारही आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिने आपल्या आजीकडे पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध कामा आणि अल्बलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान, ती तरुणी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले आणि तपासाची चक्रे फिरू लागली.
१६ जणांची डीएनए चाचणी आणि तपासाचे आव्हान
पीडित तरुणी बोलू शकत नसल्यामुळे तिच्यावर नेमका कोणी अत्याचार केला, हे शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. तपासादरम्यान पीडितेने समुपदेशनात काही खुणांद्वारे यापूर्वी अनेकांनी अत्याचार केल्याचे सुचवले होते. संशयावरून पोलिसांनी आधी एका पुरुषाला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.
मात्र, तपासात पारदर्शकता आणण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबातील सदस्य आणि आसपासच्या एकूण १६ पुरुषांचे रक्ताचे नमुने आणि डीएनए गोळा केले. या नमुन्यांची तुलना गर्भातील भ्रूणासोबत करण्यात आली.
फॉरेन्सिक रिपोर्टने सत्य समोर आणले
२७ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाने पोलिसांनाही धक्का बसला. १६ नमुन्यांपैकी केवळ एकाच व्यक्तीचा डीएनए जुळला आणि तो नमुना पीडित मुलीच्या सख्ख्या पित्याचा होता. मार्च ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा नराधम बाप आपल्याच असहाय्य मुलीवर अत्याचार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी आरोपी पित्याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.