मुंबईतील मीरा रोड परिसरात एका महिलेला कबुतरांना दाणे टाकण्यास रोखले म्हणून वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात संबंधित महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी काशिमीरा पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईउच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही घटना घडली आहे.
महेंद्र पटेल (वय, ६९) आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल (वय, ४६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून, महेंद्र यांनी रविवारी सकाळी परिसरातील एका महिलेला कबुतरांना दाणे टाकण्यास रोखले. कबुतरांमुळे रहिवाशांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असून उच्च न्यायालयानेही मुंबई महानगरपालिकेला कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांविरुद्ध कडक करवाईचे निर्देश दिले आहेत, असेही ते म्हणाले. मात्र, यावरून महेंद्र पटेल आणि संबंधित महिलेत बाचाबाची झाली. आवाज ऐकून प्रेमल घटनास्थळी आला आणि त्यानेही महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद मिटण्याऐवजी आणखी पेटला. त्यानंतर चार जणांनी महेंद्र आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली आणि रोखंडी रॉडने हल्ला केला.
प्रेमल पटेलने दिलेल्या तक्रारीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत कोणलाही गंभीर दुखापत झाली नसून लोखंडी रॉड वापरल्याच्या दाव्यांची पोलीस पडताळणी करत आहेत. याप्रकरणी आरोपींना नोटीस बजावण्यात आल्या असून द्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देशकबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे नागरिकांना झुनोटिक यासारखा गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला कबुतरांना खायला देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.