"मी प्रामाणिकपणे काम केलं...", चोरीच्या आरोपामुळे मोलकरणीची मालकाच्या घरात आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:46 IST2025-11-05T14:45:55+5:302025-11-05T14:46:52+5:30
२७ वर्षीय तरूणीचा मालकाच्या घरातील बाल्कनीत मृत्यू

"मी प्रामाणिकपणे काम केलं...", चोरीच्या आरोपामुळे मोलकरणीची मालकाच्या घरात आत्महत्या?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मालकाच्या घरातील बाल्कनीमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार अँटॉप हिल येथे मंगळवारी घडला आहे. तिच्यावर १० लाख रुपयांचे दागिने चोरील्याचा संशय घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
चोईसांग तामांग (मूळ रा. दार्जिलिंग) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती दोन वर्षांपासून अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीत घरकाम करत होती. ती तिथेच राहत होती. मंगळवारी सकाळी ती घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच अँटॉप हिल पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिचा मोबाइलसह अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी पावडे यांनी सांगितले.
‘मी प्रामाणिकपणे काम केले, चोरी केली नाही’
पोलिसांच्या हाती सुसाइड नोट लागली आहे. त्यात ‘मी प्रामाणिकपणे काम केले. काही चोरी केलेली नाही,’ असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये कुणावरही आरोप केलेला नाही. तामांग हिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविण्यात येत आहे. प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळले नसून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.