Join us

Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 00:00 IST

Dharavi Shot: धारावी येथील ९० फिट रोडवर रविवारी ही घटना घडली.

मुंबई : धारावीत झालेल्या गोळीबारमध्ये एक महिला जखमी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोळी झाडणाऱ्याची ओळख पटली नसून, सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. शस्त्र हाताळत असताना त्यातून गोळी सुटल्याचा प्राथमिक संशय असून याप्रकरणी शाहू नगर पोलीस तपास करत आहे. 

धारावी येथील ९० फिट रोडवर रविवारी ही घटना घडली. धारावी परिसरात रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी उभी असलेल्या महिलेच्या हातावर गोळी लागली. तक्रारदार महिला सर्वरी शेख (वय, ३२) ही मूळची बिहारची रहिवासी असून तिच्या पतीचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. ती धारावी परिसरात पती व मुलांसह राहते. या गोळीबारात तिच्या हाताला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

महिला मूळची बिहारमधील रहिवासी आहे. तिचे येथे कोणाशी वाद नाही. त्यामुळे शस्त्र हाताळत असताना चुकून तिला गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या कुटुंबियांकडूनही कोणाविरोधात संशय वर्तविण्यात आलेला नाही. परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली असून त्यात कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. महिलेवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. रविवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून याप्रकरणी तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :धारावीमुंबईमहाराष्ट्रगुन्हेगारी