नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढा;मुंबई काँग्रेसने केली सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 05:52 IST2025-05-29T05:52:13+5:302025-05-29T05:52:44+5:30
लाेकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून पितळ उघडे

नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढा;मुंबई काँग्रेसने केली सरकारकडे मागणी
मुंबई : ‘नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई’ या मथळ्याखाली दैनिक ‘लोकमत’ने बुधवारी नालेसफाई कामातील भ्रष्टाचार एका स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणल्यानंतर मुंबईकाँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड तसेच काँग्रेस आ. अस्लम शेख यांनी समाजमाध्यमांवर ‘लोकमत’चे कौतुक केले आणि नालेसफाईच्या संपूर्ण कामाची ‘एसीबी’मार्फत चौकशी करावी, तसेच महायुती सरकारने यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खा. गायकवाड यांनी केली आहे.
गायकवाड यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी समाजमाध्यमांवर पोस्ट करीत, नाल्याच्या स्वच्छतेमध्ये बीएमसी कंत्राटदाराच्या साठमारीचा पर्दाफाश करणाऱ्या या स्टिंग ऑपरेशनबद्दल लोकमतचे कौतुक केले. लोकमतच्या बातमीचा संदर्भ देत, “आम्ही सांगत होतो, आता इथे तर नालेसफाईच्या कामात महापालिका आणि ट्रिपल इंजिन सरकारकडून प्रचंड भ्रष्टाचार होतो, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे,” अशी प्रतिक्रियाही खा. गायकवाड यांनी व्यक्त केली.
लाेकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून पितळ उघडे
काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही ‘लोकमत’चे कौतुक करत खा. गायकवाड यांची पोस्ट री-पोस्ट केली. यावर आपले मत व्यक्त करताना शेख म्हणाले, “पालिका नालेसफाई करत नाही, तर फक्त मोबाइल ॲप जगलरी आणि कंत्राटदारांचे सेटिंग करत असल्याचेच या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले आहे. मुंबई चिखलात बुडत असताना पालिका अधिकारी घरी बसून फोनवर कामे मंजूर करतात. ही ‘जनतेच्या पैशाची सफाई आहे,” असा आरोप शेख यांनी केला.