कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड' रहिवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तक्रारीनंतर BMC ने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:38 IST2026-03-09T13:30:21+5:302026-03-09T13:38:22+5:30
मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोडविरोधात ६५० कुटुंबांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड' रहिवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तक्रारीनंतर BMC ने घेतला निर्णय
Coastal Road Jai Ho Music: मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कोस्टल रोडवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बनवण्यात आलेला 'म्युझिकल रोड' आता वादाच्या भोऱ्यात सापडला आहे. ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांनी या रस्त्यावरून येणाऱ्या सततच्या आवाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तब्बल ६५० कुटुंबांनी स्वाक्षरी करून मुंबई महापालिका आयुक्तांकडे रस्त्यावरील संगीत बंद करण्याची मागणी केली आहे.
मुंबई कोस्टल रोडच्या एका ठराविक पट्ट्यावर वाहने ६० ते ८० किमी प्रतितास वेगाने धावल्यास ऑस्करविजेत्या जय हो गाण्याची धून ऐकू येते. रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित वेग राखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ११ फेब्रुवारी रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, ज्या उद्देशाने हे संगीत सुरू केले, तेच आता रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
ब्रीच कँडी एएलएम आणि रेसिडेंट्स फोरमने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर मुद्दे मांडले आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत ही धून सतत वाजत असल्याने परिसरातील शांतता भंग पावत आहे. आम्ही घराच्या खिडक्या उघडू शकत नाही. गाण्याचा आवाज घरात सतत गुंजत राहतो, जो अतिशय त्रासदायक आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या झोपेवर आणि अभ्यासावर परिणाम होत आहे. हाय-स्पीड कॉरिडॉरवर अशा प्रकारचे संगीत चालकांचे लक्ष विचलित करू शकते, ज्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असेही या पत्रात म्हटलं आहे.
बीएमसीकडून दखल आणि 'डेसिबल' चाचणी
रहिवाशांच्या वाढत्या तक्रारींनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पालिकेने संबंधित कंत्राटदाराला आणि तांत्रिक सल्लागाराला या परिसरातील डेसिबल मोजण्याचे आदेश दिले आहेत. रहिवाशांना त्रास न होता हा प्रकल्प कसा सुरू ठेवता येईल किंवा त्यात काय बदल करता येतील, याचा अभ्यास आता केला जात आहे.
स्थानिक रहिवासी कविता चावला म्हणतात की, "आमची सोसायटी थेट या म्युझिकल स्ट्रेचच्या समोर आहे. रात्रीच्या वेळी हा आवाज अधिक तीव्रतेने ऐकू येतो, ज्यामुळे झोप लागणे कठीण झाले आहे. आम्ही ६ मार्च रोजी पालिकेला पुन्हा पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे."
जगातील इतर म्युझिकल रोड आणि मुंबईचा फरक
साधारणपणे जगात जिथे म्युझिकल रोड आहेत, ते मानवी वस्तीपासून दूर किंवा कमी लोकवस्तीच्या भागात आहेत. मात्र, मुंबईचा हा रस्ता अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या ब्रीच कँडी परिसरात असल्याने हा पेच निर्माण झाला आहे. आता पालिका प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.