Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:14 IST

Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देणारा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून उच्च न्यायालयाची इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दोन्ही न्यायालयांच्या अधिकृत मेलवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. या माहितीमुळे न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आणि वकिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

इमारत रिकामी, परिसरात नाकेबंदी

बॉम्बे उच्च न्यायालयाला मिळालेली धमकी गांभीर्याने घेत प्रशासनाने तातडीने इमारतीतील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना बाहेर काढले. बॉम्बशोधक पथक तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालयाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी करण्यात आली. याच दरम्यान वांद्रे न्यायालयानेही सुरक्षा वाढवून तपासणी मोहीम राबवली.

संशयास्पद काहीही आढळले नाही

सकाळपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेनंतर, सुदैवाने दोन्ही न्यायालयांच्या आवारात कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट केले असले, तरी सुरक्षेच्या दृष्टीने अद्यापही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

मुंबई पोलिसांनी या धमकीच्या ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे. हा ईमेल कोठून आला, पाठवणाऱ्याची ओळख काय आणि त्यामागील नेमका हेतू काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. अफवा पसरवून दहशत निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहिल्यानगर: जिल्हाधिकारी कार्यालय उडून देण्याच्या धमकीचा मेल 

जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडून देण्याच्या धमकीचा मेल गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास धडकला.  ही माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्यासह पथक जिल्हाधिकारी  कार्यालयात दाखल झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय च्या अधिकृत मेलवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा मेल आला. या मेलची दखल घेत पोलिसांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची तपासणी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्या असून,पोलिसांचा मोठा फौज फाटा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bomb threat at Bombay High Court triggers security scare.

Web Summary : A bomb threat email targeting Bombay High Court and Bandra court sparked panic. The High Court was evacuated, and a search operation was conducted. No explosives were found, and police are investigating the source of the email.
टॅग्स :मुंबईस्फोटकेमहाराष्ट्रमुंबई पोलीस