Mumbai bomb blast 2006 verdict: ज्या साखळी बॉम्बस्फोटांनी अवघा देश हादरला होता, त्या खटल्यातील सर्व ११ आरोपी निर्दोष असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाने तपासावरच ठपका ठेवत विशेष मकोका न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेला शिक्षेचा निर्णय रद्द केला. हा निकाल देताना न्यायालयाने तपासातील तीन गोष्टींवर बोट ठेवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंठपीठाने हा निकाल दिला. विशेष मकोका न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१५ रोजी १२ पैकी ५ आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. आरोपींनी मकोका न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट, न्यायालय काय म्हणाले?
निकाल देताना मुंबई न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. किरकोळ शंका दूर करण्यापलीकडे काहीही सिद्ध करू शकले नाहीत. स्फोट घडवण्यासाठी कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरले गेले, हे सरकारी पक्षकार निश्चितपणे सांगू शकले नाही, असे न्यायालयाने म्हटले.
ज्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली, न्यायालयाला ती विश्वासार्ह वाटत नाही. बॉम्बस्फोट झाल्यानंतर १०० दिवसांनी टॅक्सी चालक किंवा लोकल रेल्वेतील इतर लोकांना आरोपीला ओळखणे हे पटण्यासारखे नाही. गु्न्हा कबूल करण्यापूर्वी त्यांना यातना दिल्या गेल्या होत्या, हा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला.
न्यायालय म्हणाले की, पोलिसांनी जे पुरावे गोळा केले, ज्यामध्ये बॉम्ब, बंदूका, नकाशे इत्यादी ते महत्त्वाचे नाही आणि सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने ११ आरोपींना निर्दोष ठरवले. या खटल्यात १२ आरोपी होते, यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
पाच जणांना फाशी, तर ७ जणांना झाली होती जन्मठेप
३१ जानेवारी २०२५ पर्यंत न्यायालयाने सलग सात महिने सुनावणी घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मकोका न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा, तर ७ जणांना जन्मठेप सुनावली होती.
११ जुलै २००६ मध्ये मुंबईमध्ये लोकल रेल्वेमध्ये सात बॉम्बस्फोट करण्यात आले होते. पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये हे स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटात १८९ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ८२४ लोक जखमी झाले होते. गर्दीच्या वेळी म्हणजे ६.२४ ते ६.३५ या कालावधी हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते.