१ कोटीच्या घरांसाठी ९९९ अर्ज; मुंबई BMC च्या घरांच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद, कुठल्या घराची किती किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:34 IST2025-11-11T18:33:22+5:302025-11-11T18:34:23+5:30
मुंबई महापालिकेकडून ४२६ घरांसाठी लॉटरी काढण्यात येत असून त्याकरिता सोमवारपर्यंत २३ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. सर्वात महाग ...

१ कोटीच्या घरांसाठी ९९९ अर्ज; मुंबई BMC च्या घरांच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद, कुठल्या घराची किती किंमत?
महापालिकेकडून ४२६ घरांसाठी लॉटरी काढण्यात येत असून त्याकरिता सोमवारपर्यंत २३ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. सर्वात महाग असलेल्या भायखळ्यातील एक कोटी रुपयांच्या घरांसाठी ९९९ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यापाठोपाठ कांजूरमधील घरांना ९७०, जोगेश्वरी परिसरातील घरांसाठी १ हजार १५३ जणांनी नोंदणी केली आहे. गोरेगाव, कांदिवली पूर्व आणि भांडुप परिसरातील घरांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या सोडतीतील घरांसाठी अर्ज प्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अनेकांनी संकेतस्थळाला एकाच वेळी भेट दिल्याने संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे दिवसभर लॉटरीची माहिती मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांची निराशा झाली.
लॉटरीसाठी उत्पन्न मर्यादा झाली निश्चित
या लॉटरीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईइब्ल्यूएक) वार्षिक सहा लाख रुपये आणि कमी उत्पन्न गटांसाठी (एलआयजी) नऊ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटचे तीन दिवस
१. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या नियमानुसार चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांकडून पालिकेला प्रीमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात.
२. या नियमाच्या पार्श्वभूमीवर बड्या विकासकांकडून ८०० घरे पालिकेला मिळाली आहेत. त्यातील ४२६ घरांची सोडतीद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेकडून पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर २० नोव्हेंबरला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढली जाणार आहे. या घरांसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
- घरांसाठी एकूण नोंदणी- २३,७०४
- नोंदणी शुल्क भरुन अर्ज निश्चिती- १,६४४
- अनामत रक्कम भरुन निश्चिती- ८५५