Join us
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:54 IST

Devendra Fadnavis on Raj Thackeray, Mumbai BMC Election 2026: राज्यात १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत

Devendra Fadnavis on Raj Thackeray, Mumbai BMC Election 2026: राज्यात सध्या महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. याचदरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठे विधान केले. "उद्धवसेनेशी हात मिळवणी करणे ही मनसेची सर्वात मोठी चूक आहे. या आघाडीमध्ये सर्वाधिक नुकसान मनसेचे होईल. आम्ही आणि एकनाथ शिंदे घट्ट मित्र आहोत. मनसेला मदत करण्याची आमची मानसिकता नाही. पण राज ठाकरे आणि मी आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. सध्या प्रचार सुरू असल्याने ते माझ्या विरोधात बोलतात, मी त्यांच्या विरोधात बोलतो. पण ते शत्रू नाहीत, केवळ राजकीय विरोधक आहेत. १६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्याशी आमच्या पक्षाचे इतके टोकाचे भांडण झाल्यावरही मी आणि ते समोरासमोर आलो की एकमेकांशी बोलतो, सोबत चहा पितो. ही आपली राजकीय संस्कृती आहे. कारण हे लोक शत्रू नाहीत, तर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे त्यांच्या नीतीचा आणि वृत्तीचा मी टोकाचा विरोध करणार आणि सत्ता मिळवणार. २०१९मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला होता. नंतर एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले आणि आमची महायुती अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही अजित पवारांना सोबत घेतले. आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली. २०१९ मध्ये आमच्यासोबत जो विश्वासघात झाला, त्याला हे एकप्रकारे आम्ही हे उत्तर दिले."

"मुंबईत ठाकरे बंधू सध्या वेगळ्या पद्धतीची रणनीती आखत आहेत. सकाळी एक वाद सुरू करायचा आणि त्यावर दिवसभर चर्चा घडवून आणायची अशी त्यांची रणनीती दिसून येते. असे जेव्हा घडते तेव्हा दिवसभर त्याचा वादाभोवती सगळ्या चर्चा सुरु राहतात. त्यामुळे विकासावर कुणीच बोलत नाही. कारण या सर्वांना माहिती आहे की जर निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली गेली किंवा विकासाच्या गोष्टी बोलाव्या लागल्या, तर हे लोक निरुत्तर होतील," अशी रोखठोक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या रणनीतीवर टीकाही केली.

"विरोधी पक्ष ठेवायचाच नाही असा आमचा विचार नाही. विरोधी पक्षाची हल्ली मानसिकताच नाही. विरोधात कधीतरी बसावे लागू शकते, संघर्ष करावा लागू शकतो, असा यांच्या विचारच नसतो. संघर्षासाठी रस्त्यावर उतरावे लागते, स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावावी लागते ही त्यांची मानसिकता नाही. हे लोक घरात बसून सारंकाही करू इच्छितात. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही निराश आहेत," असे फडणवीसांनी सुनावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis: After 16th, we'll have tea with Raj Thackeray.

Web Summary : Fadnavis stated that despite political differences, he and Raj Thackeray are friends and will have tea together after elections. He criticized Thackeray brothers' strategy and opposition's mentality.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६देवेंद्र फडणवीसराज ठाकरेमनसेउद्धव ठाकरे