Mumbai BMC Election 2026 BJP vs Shiv Sena AB Form Controversy: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातील सुरुवातीचा कल हाती येऊ लागले आहेत. या कलानुसार, भाजप-शिंदेसेना युतीला मुंबई महानगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळत असल्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिंदेसेना दोघांसाठीही ही बाब आनंददायी असली, तरीही शिंदेसेनेला एका ठिकाणी 'जोर का झटका धीरे से' असा निकाल पाहायला मिळाला. मुंबईतील प्रभाग क्रमांक १७३ (सायन-प्रतीक्षा नगर) मध्ये अत्यंत नाट्यमय निकाल समोर आला. भाजपच्या अधिकृत उमेदवारीला बगल देत 'ड्युप्लिकेट एबी फॉर्म' (कलर झेरॉक्स) जोडून निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुस्कर यांनी शिंदेसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
काय होता एबी-फॉर्मचा गोंधळ
सायन-प्रतीक्षानगर हा प्रभाग महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आला होता. शिंदे गटाने येथून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. निवडणूक अर्ज भरताना शिल्पा केळुस्कर यांनी भाजपचा अधिकृत 'एबी फॉर्म' नसल्याने त्याची कलर झेरॉक्स जोडली होती. याप्रकरणी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रारही केली होती. केळुस्करांना 'एबी फॉर्म चोर' असेही संबोधले गेले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला आणि आज शिल्पा केळुस्कर यांनी बंडखोरी करत पूजा कांबळे यांचा १,७२२ मतांनी पराभव केला. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
'५० खोके'च्या घोषणांनी चर्चेत आला होता प्रचार
प्रचारादरम्यान शिल्पा केळुस्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाच्या उमेदवाराला लक्ष्य केले होते. "५० खोके, एकदम ओक्के" अशा घोषणा देत त्यांनी केलेल्या प्रचारामुळे हा वॉर्ड संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय ठरला होता. या विजयामुळे वॉर्ड १७३ मध्ये आता भाजपच्या बंडखोर उमेदवाराचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, हा निकाल महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचे प्रतिबिंब मानला जात आहे.
Web Summary : In Mumbai BMC election, a rebel BJP candidate, using a duplicate AB form, defeated the Shinde Sena candidate in Ward 173. This victory highlights internal conflict within the Mahayuti alliance, delivering a setback to Shinde's faction despite BJP support.
Web Summary : मुंबई बीएमसी चुनाव में, एक बागी भाजपा उम्मीदवार ने, डुप्लिकेट एबी फॉर्म का उपयोग करके, वार्ड 173 में शिंदे सेना के उम्मीदवार को हराया। यह जीत महायुति गठबंधन के भीतर आंतरिक संघर्ष को उजागर करती है, और भाजपा के समर्थन के बावजूद शिंदे गुट के लिए एक झटका है।