मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 20:12 IST2021-03-19T20:11:21+5:302021-03-19T20:12:04+5:30
Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RT-PCR) घेतल्या जाणार आहेत.

मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या
Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RT-PCR) घेतल्या जाणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईतील गर्दीची ठिकाणं निवडून संबंधित ठिकाणी कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट घेतल्या जाणार आहेत. यात मुंबईतील ठराविक रेल्वे स्थानकांचा परिसर, बस स्थानकं आणि बाजाराच्या ठिकाणांचा समावेश असणार आहे, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.
मुंबईतील गर्दी होणाऱ्या ठराविक मॉल्सच्या बाहेरही लोकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येणार असल्याचंही चहल म्हणाले. या माध्यमातून शहरातील कोरोना चाचण्या देखील वाढतील आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सहजपणे शोध घेता येईल, असं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत गुरुवारी तब्बल २८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील रुग्ण संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालिकेकडून पुन्हा एकदा कठोर निर्बंध आणि कोरोना चाचण्या वाढविण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात नाइट कर्फ्यू लावण्याची आवश्यत असल्याचं स्पष्ट विधान महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधीच केलं आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे.