Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:03 IST2025-09-02T15:02:48+5:302025-09-02T15:03:26+5:30

डहाणूच्या चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलाक किंवा चामढोक (पेंटेड स्टॉर्क) या करकोचा जातीचे पक्षी विहार करताना दिसताहेत.

Mumbai: Birdlife descends on Chandrasagar Bay in Dahanu | Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव

Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव

लोकमत न्यूज नेटवर्क 
बोर्डी: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलाक किंवा चामढोक (पेंटेड स्टॉर्क) या करकोचा जातीचे पक्षी विहार करताना दिसताहेत. या खाडीत भराव टाकल्याने पाणथळ पक्ष्यांनी पाठ फिरवल्याने कांदळवन आणि जैवविविधतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत सजग महिलेने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावर भराव हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी खाडी भरावमुक्त करण्यात आली. या खाडीवर जमीन मालकांनी मातीचा भराव करून मोठे बांध बांधले होते.

खारफुटीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश
खाडीतील जैवविविधता तसेच कांदळवनाच्या नुकसानाची दखल संवेदनशील नागरिक संगीता मंगळ्या कडू यांनी घेतली. त्यांनी उच्च न्यायालयात २०२३ साली याचिका दाखल केली. ३ एप्रिल २०२५ रोजी उच्च न्यायालयाने रिट याचिका निकाली काढून सीआरझेडचे उल्लंघन करून जमिनीवर बेकायदा भराव घालण्यासह खारफुटीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच अहवाल सादर करण्याचे निर्देश देत, ९ जून रोजीच्या आदेशानुसार सहा आठवड्यांत परिस्थिती पूर्ववत करण्याचे म्हटले होते. 

परिसंस्थेला पोषक वातावरण
जून आणि जुलै महिन्यांत नऊ ठिकाणी बांध फोडून पूर्वस्थिती निर्माण करण्यात आल्याचा अहवाल न्यायालयाला पाठविला. खाडीतील परिसंस्थेला पोषक वातावरण निर्माण झाल्यानेच पक्षी पुन्हा अवतरलेत. अन्य जातींचे पक्षी असण्याची शक्यता असून, ही घटना पक्षीनिरीक्षकांसाठी शुभवर्तमान ठरले आहे. वाइल्डकेअर स्वयंसेवक सागर पटेल व छायाचित्रकार समीर भालेरकर यांनी या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्र टिपली आहेत.

Web Title: Mumbai: Birdlife descends on Chandrasagar Bay in Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.