बोरिवली पुलाखाली थरार! आरोपीने खेचून नेले अन्... 'दागिने' देऊन महिलेने वाचवला स्वतःचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:48 IST2025-11-12T15:47:04+5:302025-11-12T15:48:38+5:30
मुंबईत भरदिवसा एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बोरिवली पुलाखाली थरार! आरोपीने खेचून नेले अन्... 'दागिने' देऊन महिलेने वाचवला स्वतःचा जीव
Mumbai Crime: दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना, मुंबईत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवली पश्चिम येथील सुधीर फडके पुलाखाली सोमवारी संध्याकाळी एका २९ वर्षीय महिलेला अडवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने प्रसंगावधान राखत स्वतःचे दागिने आणि मोबाईल आरोपीला देऊन आपला जीव वाचवला. पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपीला बेड्या ठोकून तुरुगांत टाकलं आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित महिला कामावर जात असताना ही घटना घडली. आरोपीने महिलेला अडवले आणि तिला पुलाखाली असलेल्या एका निर्जन ठिकाणी ओढून नेले. या ठिकाणी आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिलेने प्रसंगावधान राखले. तिने आरोपीला सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन देऊन, कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली.
या धक्कादायक घटनेनंतर महिलेने तातडीने बोरिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. झोन ११ चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने एक विशेष पथक तयार केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शोध मोहिमेनंतर, उपनिरीक्षक तुषार सुखदेव यांच्या नेतृत्वाखालील मालवणी पोलीस शोध पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीला पकडले. अटक केल्यानंतर आरोपीला बोरिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी आरोपीकडून महिलेचे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. महिलेचे सोन्याचे कानातले, सोन्याची अंगठी, मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य आरोपीकडे सापडले. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५२००० रुपये आहे. संजय राजपूत असे आरोपीचे नाव असून तो दहिसरमधील प्रेम नगर येथील रहिवासी आहे. तो हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे आणि रस्ते झाडण्याचे काम करून उदरनिर्वाह करतो.
बोरिवली पश्चिम येथील सुधीर फडके पुलासारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे हे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.