या महिन्याच्या सुरुवातीला अंधेरी पूर्वेतील एका मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून फोन आणि रोख रक्कम यासह चोरीला गेलेली मालमत्तादेखील जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही चोरी ८ सप्टेंबरच्या सुमारास घडली, जेव्हा अज्ञात लोकांनी दुकानात घुसून विविध ब्रँडच्या सुमारे १५० घड्याळे, १० मोबाईल फोन आणि रोख रक्कम पळवून नेली. तक्रारीनंतर, अधिकाऱ्यांनी तांत्रिक देखरेख आणि माहिती देणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून तपास सुरू केला.
मुख्य आरोपी, ४६ वर्षीय मोइनुद्दीन नाझिम शेख याला प्रथम अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, मुंब्रा येथील रहिवासी हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याचा जबाब नोंदवून तुर्भे आणि डोंगरी येथून त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. साबीर शेख (वय, ४०), डोंगरी येथील अमरुद्दीन अली हसन शेख (वय, ६०) आणि ऐरोली येथील प्रभू भागलू चौधरी (वय, ३०) अशी त्यांची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितले की, साबीर शेखवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. तर, अमरुद्दीन अली हसन शेख आणि प्रभु भागलू चौधरी यांच्यावर यापूर्वी पाच इतर गुन्हे दाखल आहेत.