ज्यूस द्यायला गेलेल्या डिलिव्हरी बॉयचा स्विमिंग पूलमध्ये मृत्यू; 'त्या' इमारतीच्या २२ व्या मजल्यावर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:54 IST2025-07-03T16:54:17+5:302025-07-03T16:54:37+5:30
मुंबईत डिलिव्हरी बॉयचा स्विमिंग पूलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्यूस द्यायला गेलेल्या डिलिव्हरी बॉयचा स्विमिंग पूलमध्ये मृत्यू; 'त्या' इमारतीच्या २२ व्या मजल्यावर काय घडलं?
Mumbai Accident: दक्षिण मुंबईतील एका आलिशान इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील स्विमिंग पूलमध्ये पडून एका ४४ वर्षीय ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. फुड डिलिव्हरी करताना ४ ते ४.५ फूट खोल स्विमिंग पूलमध्ये घसरून पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डिलिव्हरी बॉयला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील लक्झरी टॉवरमध्ये मंगळवारी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. मृत डिलिव्हरी बॉय डोंगरी परिसरातील रहिवासी आहे. ही घटना १ जुलै रोजी रात्री ग्रँट रोड रेल्वे स्टेशनजवळील दर्शन वोनालजो इमारतीच्या २२ व्या मजल्यावर घडली. मृताचे नाव इम्रान अकबर खोजादा असे आहे. गावदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोजादा हर्षवर्धन मिश्रा नावाच्या रहिवाशाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे दिलेला ज्यूस ऑर्डर देण्यासाठी गेला होता.
प्राथमिक तपासानुसार, खोजादा स्विमिंग पूल परिसरात फोनवर बोलत असताना तो घसरला आणि पाण्यात पडला. मदत पोहोचण्यापूर्वीच तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. जेव्हा हर्षवर्धन मिश्रा यांना बराच वेळ डिलिव्हरी मिळाली नाही आणि डिलिव्हरी बॉयचा फोन बंद असल्याचे त्यांना संशय आला. त्यांनी खाली जाऊन तपासणी केली असता डिलिव्हरी मॅन खोजादा स्विमिंग पूलमध्ये तरंगताना आढळला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली.
याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खोजादाच्या भावाने सांगितले की, आम्हाला या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही आणि घटनेबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही.
दुसरीकडे, वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड परिसरातील समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला वांद्रे पोलिसांनी वाचवले. नैराश्यामुळे आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेने समुद्रात उडी मारली. मात्र पोलिसांनी तिला बाहेर काढलं आणि तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं.